मुंबई: देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय आता त्यांचा मुक्काम लवकरच लंडनमध्ये हलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात अंबानी कुटुंबीय काही काळ मुंबई आणि लंडनमध्ये व्यतीत करतील. काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी लंडनच्या बकिंगहमशायर येथे 300 एकरात पसरलेली स्टोक पार्क ही मालमत्ता 592 कोटींना विकत घेतली होती.
‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे असून त्यामध्ये 49 बेडरुम्स आहेत. सध्या याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह याठिकाणी राहायला जातील, असे सांगितले जाते. स्टोक पार्क हे अंबानी कुटुंबीयांचे सेकंड होम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळातही अंबानी कुटुंबीय रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या जामनगर येथे जाऊन राहिले होते.
अंबानी कुटुंबीयांना गेल्यावर्षी सेकंड होमसाठी लंडनमध्ये घराचा शोध सुरु केला होता. मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाप्रमाणेच स्वतंत्र इमारत असावी, असा अंबानी कुटुंबीयांचा आग्रह होता. अखेर स्टोक पार्क ही मालमत्ता अंबानी कुटुंबीयांच्या नजरेत भरली आणि हा व्यवहार पार पडला. ऑगस्ट महिन्यापासून याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरु झाले होते.
अंबानी कुटुंबीय दरवर्षी दिवाळी मुंबईतच साजरी करतात. मात्र, बऱ्याच वर्षांनंतर अंबानी कुटुंबीय दिवाळीच्या काळात परदेशात आहेत. दिवाळीनंतर ते मुंबईत परततील. त्यानंतर ते साधारण एप्रिल महिन्यात लंडनच्या स्टोक पार्कमध्ये राहायला जातील, अशी माहिती आहे.
आगामी काळात अंबानी कुटुंबीय मुंबई आणि लंडनमध्ये आलटून-पालटून राहतील. स्टोक पार्कमध्ये अँटिलियाप्रमाणेच मंदिर उभारले जात आहे. त्यासाठी राजस्थानहून खास गणपती, हनुमान आणि राधाकृष्णाची मूर्ती मागवण्यात आली आहे. या मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी भारतातून दोन खास पुजारीही याठिकाणी जाणार आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अंबानी कुटुंबीय लंडनमध्येच आहेत. याठिकाणी सर्व गोष्टी मार्गी लागल्यानंतर अंबानी कुटुंबीय मायदेशी परततील, असे सांगितले जाते.
स्टोक पार्क हे 300 एकरांमध्ये पसरले आहे. 1908 पर्यंत स्टोक पार्क खासगी मालमत्ता होती. त्यानंतर याचे रुपांतर कंट्री क्लबमध्ये करण्यात आले. स्टोक पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल आणि गोल्फ कोर्स आहे. जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण स्टोक पार्कमध्ये झाले होते. याठिकाणी एक लहानसे रुग्णालयही उभारण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Sachin Vaze : सचिन वाझेने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? सर्वात मोठं कारण समोर