अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झालेला आहे. अधिकृत असं तालिबानचं अजून
सरकार सत्तेवर आलेलं नाही. जोपर्यंत अमेरीकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही
तोपर्यंत सरकार स्थापन करणार नसल्याची भूमिका तालिबाननं जाहीर केलीय. त्याच पार्श्वभूमीवर
तालिबान सरकारला अधिकृत कारभार सुरु करायला काहीसा वेळ लागण्याची शक्यता वर्तवली
जातेय.
तालिबाननं सत्ता हातात घेतलीय. जे लोक सरकारी नोकरीत होते त्यांना कामावर परतण्याचे आदेश
दिलेत. महिलांना पुन्हा काही कामं करण्यावर अचानक बंदी आणलीय. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रापुरतच
महिलांना काम करण्याची मुभा दिलीय. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोक नेमकी कशाची
खरेदी करतायत असा सवाल पडू शकतो. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न स्थानिक न्यूज एजन्शी पझवोकने
केलाय. आश्चर्य म्हणजे त्यांच्या शोधात अफगाण लोक दोन वस्तुंची जोरदार खरेदी करत असल्याचं
उघड झालंय. त्या दोन वस्तू आहेत- पहिली पगडी आणि दुसरी हिजाब.
हिजाब आणि पगडीची खरेदी का?
तालिबानने जेव्हापासून सत्ता काबीज केलीय तेव्हापासून लोकांचा कल वस्तू साठवण्याकडे आहे.
त्यातल्या त्यात अफगाण लोक हिजाब आणि पगडींची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याचं
स्थानिक दुकानदारांनी सांगितलं. 1996 ते 2001 च्या दरम्यान तालिबानचं सरकार अफगाणिस्तान
मध्ये होतं. त्याकाळात तालिबान सरकारनं पुरुषांना पगडी आणि महिलांना हिजाब अनिवार्य
केला होता. त्यामुळेच आताही हिजाब आणि पगडी पुन्हा अनिवार्य केली जाऊ शकते अशी भीती
लोकांना वाटतेय. त्यामुळेच पगडी आणि हिजाब खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करत असल्याचं
पझवोक ह्या स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. हिजाब आणि पगडी खरेदीत चौपट वाढ झाल्याचं
रिपोर्टमध्ये म्हटलंय.
हिजाब, पगडी, बुरख्यांच्या किंमती वाढल्या
मागणी वाढली आणि पुरवठा कमी असेल तर किंमती वाढण्याची जास्त भीती. हिजाब-पगडीच्या
किंमतीतही मोठी वाढ झालीय. आधी एका हिजाबसाठी 1 हजार अफगाणी(चलन) मोजावे लागत
होते, आता त्याची किंमत दीड हजाराकडे आहे. तर बुरख्यांची किंमत 10 टक्क्यानं वाढल्याचं CNN नं
एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. एका अफगाण महिलेनं सांगितलं की, घरात चार महिला आहेत आणि
दोनच बुरखे आहेत. तेच शेअर केले जातात. फारच अती गरज पडली तर पांघरायच्या चादरीचा
बुरखा म्हणून वापर केला जातो.
अमेरीकन अध्यक्षांचे बोल
अमेरीकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अफगाणिस्तानवर एक प्रेस कॉन्फरन्स केली. यात एका रिपोर्टरनं
तुम्ही तालिबानवर विश्वास ठेवता का असा सवाल केला. त्यावर बिडेन म्हणाले- माझा कुणावरच विश्वास
नाही अगदी तुझ्यावरही पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तालिबानला काही मुलभूत निर्णय करायचे आहेत.
तालिबान हा अफगाण लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे का, त्यांना सुरक्षा देण्याचे
प्रयत्न करणार का जे शेकडो वर्षात कुठल्याच एका समुहानं केलेलं नाही. हे जर करायचं असेल तर
त्यांना आर्थिक मदत, व्यापार, पूर्ण वेतन आणि इतर अतिरिक्त मदतीची गरज लागेल.
तालिबानचा काळ सुरु, अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? दोन वस्तुंसाठी गर्दी