नवी दिल्ली – वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न असलेल्या जगासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगाची लोकसंख्या (The world’s population)पुढच्या शतकात झपाट्याने कमी होणार आहे, नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, पृथ्वीची (earth)एकूण लोकसंख्या 2064सालापर्यंत 9.7 अब्ज या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर 2100 सालापर्यंत ती कमी होऊन 8.79 अब्ज या आकड्यापर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलने (The Lancet Medical Journal)प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार, या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताच्या लोकसंख्येत 29 कोटींची घट होण्याची शक्यता आहे. काय आहेत यामागची कारणे हे जाणून घेऊयात
गतीने म्हातारा होत असलेल्या चीन मध्ये 2100 सालापर्यंत लोकसंख्या अर्ध्यावर येईल, असे य़ा अहवालात सांगण्यात आले आहे. सध्या चीनची लोकसंख्या ही 140 कोटी आहे, ती या शतकाच्या अखेरीपर्यंत 66.8 कोटीने कमी होईल आणि 74 कोटीपर्यंत स्थिरावेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. लोकसंख्या कमी होण्याचा जो ट्रेंड आला आहे, तो बदलता येणे शक्य नसल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठीने सांगितले आहे. या अभ्यासातील निरीक्षणे ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या दाव्याच्या अगदी उलट आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने 2100 साली देशाची लोकसंख्या 11 अब्ज पर्यंत पोहचेल असा दावा केलेला आहे. सध्या जगाची लोकसंख्या ही 8 अब्जपेक्षा कमी आहे. चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिका हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत.
वाढत्या शहरीकरणासोबत, महिलांमध्ये शिक्षित होण्याचे प्रमाण वाढल्याने, त्या नोकरी करु लागल्याने, जन्मदर नियंत्रित होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुलांचे जन्म नियंत्रित करण्याची वाढलेली साधने हेही एक कारण सांगितले जात आहे. 1960 मध्ये जगातील प्रत्येक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत असे आता तेच प्रमाण 2.4 मुलापर्यंत पोहचले आहे. 2100 सालापर्यंत ही सरासरी 1.66 पर्यंत पोहचेल.
युरोपप्रमाणेच आशिया आणि दक्षिण अमेरिकेत लोकसंख्या घट सुरु झालेली आहे, ती आगामी काळात अधिक घटेल असा अंदाज या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. तर अफ्रिकेत मात्र लोकसंख्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नायजेरियात 58कोटी लोकसंख्या वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.