Israel-Iran War : इराण आणि इस्रायल यांच्यात आता तणावाचं वातावरण आहे. इराणकडून डागलेली बहुतांश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आपण आधीच नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणकडून अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक हवेतच नष्ट केल्याचं इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. यामुळेच इस्रायलचे फारसे नुकसान झाले नाही. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असे उघड झाले आहे की इराणच्या हल्ल्यासाठी इस्रायल आधीच तयार होता, कारण अरब देशांनी आधीच या हल्ल्याबाबत इस्रायला अलर्ट केले होते.
वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, अरब देशांनी त्यांची हवाई हद्द लढाऊ विमानांसाठी खुली केली, रडारवर पाळत ठेवण्याची माहिती शेअर केली आणि काही बाबतीत मदतीसाठी त्यांच्या सैन्याची सेवाही दिली. अमेरिकेने यासाठी सौदी आणि इजिप्त या दोन देशांवर माहिती देण्यासाठी दबाव आणल्याचं देखील म्हटले आहे. इस्रायलच्या दिशेने सोडलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी देखील दबाव आणण्यास सुरुवात केली.
अहवालानुसार, काही अरब सरकारांकडून सुरुवातीची प्रतिक्रिया सावध होती. त्यांना भीती होती की इस्रायलला मदत केल्याने ते थेट संघर्षात येऊ शकतात आणि इराणकडून सूड घेण्याचा धोका होता. यूएसशी पुढील चर्चेनंतर, यूएई आणि सौदी अरेबियाने गुप्तचर माहिती सामायिक करण्यास सहमती दर्शविली, तर जॉर्डनने सांगितले की ते यूएस आणि इतर देशांच्या युद्ध विमानांना इराणच्या धोक्यांना रोखण्यासाठी त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी देईल.
इस्रायल आणि इराणमधील युद्धात जॉर्डन हा मुस्लीम देश आता पाकिस्तानी कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. जॉर्डनच्या सैन्याने आपल्या F-16 लढाऊ विमानांच्या मदतीने इराणचे अनेक स्फोटक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. हे सर्व ड्रोन इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी डागण्यात आले होते, परंतु यातील बहुतांश ड्रोन इस्रायल, अमेरिका, जॉर्डन आणि ब्रिटनने वाटेतच पाडले होते.
मुस्लीम देश असूनही जॉर्डनच्या राजाने इस्रायलला मदत केली. यामुळे पाकिस्तानचे माजी खासदार आणि जमात-ए-इस्लामीचे नेते मुस्ताक अहमद यांनी जॉर्डनच्या राजाचा फोटो शेअर करत त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले आहे. हे तेच जॉर्डन आहे ज्याने अलीकडेच पाकिस्तानला F-16 लढाऊ विमान दिले होते आणि 1971 च्या युद्धातही लढाऊ विमाने दिली होती.