Israel vs Hamas War : हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाने आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल हा नेहमीच अरब देशांच्या निशाण्यावर राहिला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर अनेक मुस्लीम देशांनी इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पण दोन देश असे आहेत जे मुस्लीम देश असून देखील इस्रायलच्या बाजुने उभे राहिले आहेत. सौदी, कतार, पाकिस्तान या सर्व मुस्लीम देशांनी इस्रायलचा निषेध केला असून पॅलेस्टिनींसाठी स्वतंत्र राज्य स्थापन केले पाहिजे, असे म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीनने हमासचा निषेध करून सर्वांनाच चकित केले आहे.
यूएई आणि बहरीनसह सर्व मुस्लीम देशांनी एकेकाळी इस्रायलवर बहिष्कार टाकला होता. इस्रायलसोबत संबंध ठेवणाऱ्यांवर देखील हे अरब देश बहिष्कार टाकतात. अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे सप्टेंबर 2020 मध्ये UAE आणि बहरीनने इस्रायलसोबत अब्राहम करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर या देशांमध्ये संबंध चांगले होत असल्याचं चित्र दिसत होतं. इस्रायलशी संबंध प्रस्थापित करणार्या पहिल्या अरब देशांपैकी UAE आणि बहरीन हे दोन देश आहेत.
हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले आहे, तेव्हा या दोन्ही देशांचा दृष्टिकोन इतर अरब देशांपेक्षा वेगळा दिसतोय. या देशांच्या अधिकृत वक्तव्यांवरून असे दिसून येते की, यावेळी ते हमासच्या हल्ल्याबाबत इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहेत.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाबाबत यूएईने जे काही म्हटले आहे त्यावरून स्पष्टपणे सूचित होते की इस्रायलबाबत इस्लामिक देशाच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे.
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी निवेदनात हमास या लढाईला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पॅलेस्टिनी गट हमासने इस्रायली शहरांवर केलेले हल्ले अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मंत्रालयाने हिंसाचाराचा अंत आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायली शहरे आणि गाझा पट्टीजवळील गावांवर हमासचे हल्ले अत्यंत गंभीर आहेत आणि त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हमासने हजारो रॉकेट लोकांवर डागले आणि गोळीबार केला. इस्रायली नागरिकांचे घरातून अपहरण करून त्यांना ओलीस ठेवल्याच्या वृत्ताने यूएईला धक्का बसला आहे.
हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की UAE ने आपल्या वक्तव्यात इस्रायलच्या विरोधात कोणतीही टिप्पणी केलेली नाही. निवेदनात, दोन्ही बाजूंना तणाव संपवण्याचे आवाहन करताना, UAE ने म्हटले आहे की सर्व पक्षांच्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार नेहमीच पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यांना कधीही संघर्षाचे लक्ष्य बनवू नये.
UAE प्रमाणे, बहरीनने देखील अब्राहम करारांतर्गत 2020 मध्ये इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. बहरीननेही हमासने केलेल्या अचानक हल्ल्याचा निषेध केला आहे.
इस्त्रायली नागरिकांचे घरातून अपहरण करून त्यांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याबद्दल बहरीनने हमासची निंदा केली आहे. अरब देशाने मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून लढाई संपवण्याचा आग्रह धरला आहे.
सोमवारी बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, हमासच्या हल्ल्यामुळे परिस्थिती धोकादायक बनली आहे. “बहारिन नागरिकांचे त्यांच्या घरातून अपहरण आणि त्यांना ओलीस ठेवल्याचा निषेध करतो,” असे निवेदनात म्हटले आहे. संघर्ष थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हमासने सुरू केलेल्या शत्रुत्वाबद्दल मोरोक्कोने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मोरोक्कोच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘गाझा पट्टीतील परिस्थिती बिघडल्याने आणि लष्करी कारवाई सुरू झाल्याबद्दल मोरोक्को तीव्र चिंता व्यक्त करतो. हे हल्ले कुठेही होत असले तरीही देश नागरिकांवरील हल्ल्यांचा निषेध करतो.