मालदीवने घेतलेल्या या निर्णयामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला

| Updated on: Feb 07, 2024 | 6:10 PM

india maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध सध्या तणावाचे बनले आहेत. याचा फायदा चीनकडून घेतला जात आहे. चीन समर्थक मानले जाणारे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष चीनच्या षडयंत्राचा भाद बनले आहे. चीन नेहमीच छोट्या देशांना गुलाम करण्याचा प्रयत्न करत राहिला आहे.

मालदीवने घेतलेल्या या निर्णयामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला
Follow us on

INDIA VS CHINA :  भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव दररोज वाढत चालला आहे. चीन याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबध बिघडले आहेत. कारण मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष हे चीन समर्थक आहेत. आता मालदीवमध्ये चीनचे जहाज येत असल्याने भारताने याला विरोध दर्शवला आहे. चीन शियांग यांग हाँग 03 हे जहाज मालदीवला पाठवत आहे. या आठवड्यात ते माले येथे पोहोचणार आहे. ज्यामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, हे जहाज वैज्ञानिक संशोधनासाठी जात आहे. पण मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने काही काळापूर्वी म्हटले होते की चीनचे जहाज त्यांच्या सागरी क्षेत्रात थांबणार नाहीये. शिवाय ते कोणत्याही प्रकारचे संशोधन देखील करणार नाहीये.

संशोधन करण्यासाठी आले जहाज

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, ‘चीनचे सागरी क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन कार्यासाठी हे जहाज येत आहे. जे सागरी कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या तरतुदींचे पालन करणार आहे. अनेक वर्षांपासून चीन आणि मालदीव सागरी वैज्ञानिक संशोधनात काम करत आहे.

चीन Xian Yang Hong 03 या जहाजाचा वापर लष्करी उद्देशांसाठी करतो. हिंद महासागरात तो या जहाजाच्या माध्यमातून हेरगिरी करतो. या कारणास्तव, भारताने चिनी जहाज दीर्घकाळ थांबल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

चिनी जहाज आता मालदीवमध्ये गेले आहे, यासंदर्भात काही काळापूर्वी मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने भारतावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की, मालदीव नेहमीच मित्र देशांच्या जहाजांचे स्वागत करणारा देश आहे.

मालदीव सरकारने म्हटले होते की चिनी जहाजाने रोटेशन आणि इंधन भरण्यासाठी राजधानी माले येथे थांबण्याची परवानगी मागितली होती. चीनचे जहाज मालदीवच्या सागरी क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य करणार नाही, असे सरकारने म्हटले होते.

भारताचा आक्षेप

चीन नेहमीच हेरगिरी करण्याच्या उद्देशाने आपली जहाजे शेजारील देशांमध्ये डॉक करत असतो. याआधी अनेकदा भारतीय लष्कराने हेरगिरीचा आरोप केला आहे. चिनी जहाजे याआधी ही अनेकवेळा तामिळनाडूजवळ श्रीलंकेच्या क्षेत्रात थांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण यावर भारताने नेहमी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे श्रीलंकेने आता चिनी जहाजे थांबवण्यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.