मुंबई : गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत जागतिक स्तरावर मोठी भूमिका पार पाडत आहेत. गेल्या १० वर्षात देशाचे नाव अनेक गोष्टींच्या बाबतीत उंचावले आहे. भारत आता एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा उद्देश सरकारने ठेवला आहे. त्यामुळे भारत आता जागतिक स्तरावर देखील आपल्या मित्र देशांसोबत अनेक करार करत आहे. जगभरातील बलाढ्य आणि श्रीमंत देश भारताशी मैत्री करण्यासाठी आणि भारताचा पार्टनर होण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासारखे शक्तिशाली देश भारताचे भागीदार बनले आहेत. यात आता आणखी एक देश सहभागी होणार आहे.
सौदी अरेबिया देखील भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उत्सुक आहे. सौदी अरेबिया आगामी काळात भारताचा नवा सामरिक भागीदार बनू शकतो. या दिशेने दोन्ही देशांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसणार आहे.
भारत आणि सौदी अरेबियाने याआधी संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आणि संरक्षण औद्योगिक सहभाग, तंत्रज्ञान हस्तांतरण, द्विपक्षीय संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केलीये. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्यात मंगळवारी रियाधमध्ये चर्चा झाली. भट्ट यांनी सौदी अरेबियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री खालिद अल-बायारी यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही बाजुने संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आली.
एकीकडे पश्चिमेकडील देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना भारत आणि सौदी अरब यांच्यात संयुक्त प्रशिक्षण सराव, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण यावर चर्चा झालीये. भट्ट हे रियाध येथे होणाऱ्या वर्ल्ड डिफेन्स शो (WDS) 2024 मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला ४ फेब्रुवारीपासून सुरुवात झालीये.
एकीकडे पाकिस्तान भारतावर आरोप करत असताना भारताचा मात्र इतर मुस्लीम देशांसोबत वाढत असलेला व्यापार आणि मैत्री ही चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढवणारी आहे.