तेल अविव | 16 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. या युद्धात हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलचे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेकांनी हातात शस्त्र घेऊन हमासच्या विरोधात दोन हात केले आहेत. इस्रायलने गाजा पट्टीवर आता जमिनीवरून हल्ला करण्याची तयारीही सुरू केली आहे. हमासचं प्रमुख केंद्र असलेल्या उत्तर गाजावर ताबा मिळवण्यासाठी इस्रायलचा संपूर्ण प्रयत्न आहे. त्यामुळे हे युद्ध अजून भडकण्याची चिन्हे आहेत. हमासच्या या हल्ल्यात भारतीय वंशाच्या तीन महिलांनाही वीर मरण आलं आहे.
हमासच्या विरोधात लढताना भारतीय वंशाच्या तीन महिलांना वीर मरण आलं आहे. या तिन्ही महिला भारतीय वंशाच्या होत्या. त्यांचे आईवडील इस्रायलमध्ये स्थायिक झाले होते. त्या जन्माने इस्रायली होत्या. आईवडील अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत असल्याने त्यांना इस्रायलचं नागरिकत्व मिळालं होतं. विशेष म्हणजे या तिन्ही महिलांनी यहूदी धर्म स्वीकारला होता.
एका आकडेवारीनुसार इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय वंशाचे यहूदी लोक राहतात. या भारतीय वंशाच्या नागरिकांना बेने यहुदी म्हटलं जातं. बेने यहूदी याचा अर्थ मूळ धर्म दुसरा असलेले लोक. जे लोक इतर धर्माचे होते, पण त्यांनी आता यहूदी धर्म स्वीकारला आहे असे. म्हणजे त्यांनी धर्मांतरीत लोक. केरळ, मणिपूर आणि मिझोराममधील अनेक लोकांनी इस्रायलमध्ये यहूदी धर्म स्वीकारलेला आहे.
गेल्या 7 ऑक्टोबरपासून हमासने दक्षिण परिसरात हल्ले केले आहेत. या भयावह हल्ल्यात या तीन महिला ठार झाल्या आहेत. अशदोदच्या होम फ्रंट कमांडर लेफ्टिनंटचा मृत्यू झाला आहे. 22 व्या वर्षी युद्धात त्यांना वीर मरण आलं आहे. मोसेस तसेच पोलीस सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या सीमा पोलीस अधिकारी किम डोकरकर यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलमध्ये एक नियम आहे. प्रत्येक नागरिकाने कमीत कमी तीन वर्षापर्यंत लष्करात सेवा दिली पाहिजे. जे लोक लष्करात सेवा देत नाहीत त्यांना देशातील मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. या निमित्ताने इस्रायली नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी तयारही केलं जातं. इस्रायलच्या चोहोबाजूंनी मुस्लिम राष्ट्र आहेत. इस्रायलची सागरी परिस्थितीही संवेदनशील आहे. त्यामुळे इस्रायलने लष्करात सेवा देण्याचा नियम घालून दिला आहे.
हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे आणखी 1400 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे आणखी 2450 लोक मारले गेले आहेत. इस्रायलला उत्तर गाजावर ताबा मिळवायचा आहे. कारण उत्तर गाजा हे हमासचं केंद्र आहे. त्यामुळे हे केंद्रच इस्रायलला उद्ध्वस्त करायचं आहे.