न्यू यॉर्क : अटलांटिक महासागरात टायटॅनिकचा ढिगारा पाहण्यासाठी गेलेले 5 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. हे पर्यटक ज्या पाणबुडीतून गेले होते, त्या पाणबुडीचा शोध लागत नाहीय. सध्या या पाणबुडीला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जातेय. अमेरिका आणि कॅनडाचे अधिकारी या पाणबुडीला शोधण्यासाठी जाीवाच रान करतायत. बुडालेल्या Titanic चा ढिगारा पाहण्यासाठी रविवारी ही पाणबुडी समुद्रात उतरली होती. समुद्रात गेल्यानंतर 1 तास 45 मिनिटांनी या पाणबुडीशी संपर्क तुटला.
OceanGate या कंपनीच्या मालकीची ही पाणबुडी होती. 18 जूनला या पाणबुडीने आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. पाणबुडी समुद्रात गेल्यानंतर टायटॅनिकच्या ढिगाऱ्याच्या लोकेशनपर्यंत घेऊन जाणाऱ्या पोलर प्रिन्स या जहाजाशी असलेला पाणबुडीचा संपर्क तुटला.
पाणबुडी समुद्रात असताना कम्युनिकेशनसाठी एलन मस्कच्या स्टालिंग सॅटलाइटचा वापर करत होती. कंपनीने 1 जूनला टि्वट करुन ही माहिती दिली होती.
पाणबुडीला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कॅनडाच्या न्यूफाऊंडलँड किनाऱ्यापासून दूर अंतरावर खोल समुद्रात शोध मोहिम सुरु आहे. बॉस्टनमधील यूएस कोस्ट गार्डच्या लेफ्टिनेंट जॉर्डन हार्ट यांनी ही माहिती दिली.
पाणबुडी मजबूत आहे, असं OceanGate चे सीईओ आणि फाऊंडर स्टॉकटन रश यांनी सांगितलं. ज्या कंटेनरमध्ये लोक आणि ऑक्सिजन आहे, तो नासा आणि यूनिवर्सिटी ऑफ वाशिंगटनने मिळून तयार केलाय, असं रश यांनी सांगितलं.
अटलांटिक महासागरात बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचा समावेश आहे. त्यांनी फेसबुक पोस्टवर टायटॅनिकचा ढिगारा पाहण्यासाठी जाणार असल्याची माहिती दिली होती.
फ्रान्सचे खलाशी पॉल-हेनरी नार्गोलेट सुद्धा या पाणबुडीमध्ये आहेत. त्यांच्याकडेय टायटॅनिकच्या ढिगाऱ्यासंबंधी काम करण्याचा अनुभव आहे. खोल समुद्रात जलतरण आणि पाणबुडी चालवण्यात ते माहीर आहेत.
बेपत्ता पर्यटकांना शोधण्यासाठी वेगाने शोधकार्य सुरु आहे, असं OceanGate कडून सांगण्यात आलं. खोल समुद्राक टायटॅनिकचा ढिगारा दाखण्यासाठी OceanGate कंपनी प्रतिमाणशी 2.5 लाख डॉलर म्हणजे 2 कोटी रुपये चार्ज करते. 2021 पासून हा व्यवसाय सुरु आहे.
बेपत्ता झालेल्या पाणबुडीच नाव टायटन आहे. कंपनीचे सल्लागर डेविड कॉनकॅनन यांनी सांगितलं की, पाणबुडीमध्ये 96 तास पुरेल इतका ऑक्सिजन आहे.
टायटन पाणबुडीवरुन दर 15 मिनिटांनी पोलर प्रिन्स जहाजाला मेसेज जायचा. स्थानिक वेळेनुसार 3 वाजता शेवटचा मेसेज आला होता. त्यावेळी पाणबुडी टायटॅनिकच्या ढिगाऱ्यावर फेऱ्या मारत होती.