इस्रायल-इराण या दोन्ही देशात संबंध आधीपासून चांगले नव्हते. आता इस्रायल-हमास युद्धानंतर हे संबंध आणखी बिघडले आहेत. सध्या दोन्ही देशाच्या संबंधात प्रचंड तणाव आहे. इस्रायलने हमास विरोधात युद्ध पुकारल्यानंतर इराणने अनेकदा धमकी दिली. काही कारवाया केल्या. आता इस्रायलने त्यांच्या सवडीनुसार बदला घेण्याची कारवाई सुरु केली आहे. सीरियामध्ये इराणी दूतावासाजवळ इस्रायलने मोठा हवाई हल्ला केला. यात इस्रायली सैन्याने सीरिया आणि लेबनानमधील IRG फोर्सचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद रजा जाहेदीला संपवलं. इस्रायलने या हल्ल्यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. इस्रायली सैन्याने F-35 या स्टेल्थ फायटर जेटमधून इराणी दूतावासाच्या काऊन्सलर कार्यालयावर एका पाठोपाठ एक सहा मिसाइल्सनी हल्ला केला. यात मोहम्मद रजा जाहेदीचा मृत्यू झाला.
हल्ला इतका भीषण होता की, दूतावास परिसरातील एक इमारत ढिगाऱ्यामध्ये बदलली. या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढणार आहे. इस्रायलचा इराण आणि त्यांच्या मित्र देशांविरोधात संघर्ष आणखी वाढेल. या हल्ल्यात आयआरजीसीच्या सात सदस्यांचा मृत्यू झाला, असा दावा इराणी मीडियाने केला आहे. यात इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रज़ा ज़ाहेदी आणि त्यांचे डेप्युटी मोहम्मद हज रहीमी यांचा सुद्धा समावेश आहे.
कोण होता मोहम्मद रजा जाहेदी?
जाहेदी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्स (IRGC-QF) मध्ये वरिष्ठ अधिकारी होता. IRGC-QF ही अमेरिकेने जाहीर केलेली दहशतवादी संघटना आहे. जाहेदीकडे सीरिया आणि लेबनानमधील युनिटची जबाबदारी होती. इराणी मिलिशिया आणि हिजबुल्लासोबत चर्चेची जबाबादारी त्याच्याकडे होती. सीरिया आणि लेबनानमधील इराणचा तो वरिष्ठ कमांडर होता.
IRGC साठी मोठा झटका
सीरिया, लेबनान आणि पॅलेस्टाइन क्षेत्रातील इस्रायल विरोधातील सर्व दहशतवादी कारवायांच जाहेदीने संचालन केलं होतं, असं इस्रायली आर्मी रेडिओने म्हटलं आहे. 2020 साली बगदादमध्ये अमेरिकेने कुद्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात संपवलं होतं. त्यानंतर आता जाहेदीचा मृत्यू IRGC साठी मोठा झटका आहे.
कसा होता जाहिदीचा प्रवास?
जाहिदीचा जन्म 1960 साली झाला होता. वयाच्या 20 व्या वर्षी 1980 साली तो IRGC मध्ये सहभागी झाला. कुद्स फोर्सचा मुख्य कमांडर या नात्याने आयआरजीसी ऑपरेशनचा उप प्रमुख होता. 2005 ते 2006 दरम्यान त्याने आयआरजीसीची वायू सेना आणि 2006 ते 2008 दरम्यान ग्राऊंड फोर्सचा कमांडर म्हणून जबाबदारी संभाळली.