कोणी टेबलखाली लपले, तर कोणी… एक दोन नव्हे भूकंपाच्या 21 धक्क्यांनी अख्खं जपान हादरलं; अनेक भागात अंधार

| Updated on: Jan 01, 2024 | 4:45 PM

नव वर्षाचा पहिलाच दिवस जपानसाठी अत्यंत धक्कादायक आणि धोकादायक ठरला आहे. एक दोन नव्हे तर भूकंपाच्या तब्बल 21 धक्क्यांनी संपूर्ण जपान हादरून गेलं आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना घरे खाली करण्यास सांगितलं आहे. रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. तर हजारो घरातील बत्तीगुल करण्यात आली आहे. त्यामुळे जपानमध्ये सध्या भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

कोणी टेबलखाली लपले, तर कोणी... एक दोन नव्हे भूकंपाच्या 21 धक्क्यांनी अख्खं जपान हादरलं; अनेक भागात अंधार
Tsunami Warning
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

टोकियो | 1 जानेवारी 2024 : जपानला आज भूकंपावर भूकंपाचे धक्के बसले आहेत. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 90 मिनिटात जपानमध्ये 4.0 तीव्रतेचे एकापाठोपाठ एक असे 21 भूकंपाचे धक्के जाणवले. यातील एका भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 7.6 एवढी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याने जपानी नागरिक भयभीत झाले आहेत. जपानच्या इशिकावा प्रांताच्या नोटो शहरात मोठी त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शहरातील समुद्राच्या लाटा 5 मीटरपेक्षाही ऊंच असतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसल्याने जपानच्या काही भागात अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. 34 हजार घरातील वीज ताबडतोब बंद करण्यात आल्याने या भागात काळोख पसरला आहे. तसेच देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. भूकंपामुळे रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. अनेक घरांना तडेही गेले आहेत. फुकूई प्रांतातील फायर डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत कमीत कमी पाच जण जखमी झाले आहेत. या सर्वांना किरकोळ मार लागला आहे.

Tsunami Warning

भारतीय दूतावास अॅक्टिव्ह

भूकंपाचे वारंवार बसलेले झटके आणि त्सुनामीच्या शक्यतेमुळे स्थानिक नागरिकांना घर सोडून दूर जाण्यास सांगितलं गेलं आहे. अनेकांना घरातून बाहेर काढण्याचं कामही सुरू झालं आहे. दक्षिण कोरियाच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये भूकंप आल्यानंतर पूर्वेकडील बेटावर गँगवोन प्रांतातील काही भागात समुद्राचा जलस्तर वाढू शकतो. त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी एमर्जन्सी कंट्रोल रुम स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी तात्काळ संपर्क साधण्यास सांगितलं आहे.

भांडीकुंडी रस्त्यावर

भूकंपामुळे लोकांच्या घरातील सामान रस्त्यावर आले आहे. भांडीकुंडी रस्त्यावर पडली आहे. भूकंपाच्या भीतीने जपानी नागरिक अंगावरील वस्त्रानिशी घराच्याबाहेर पडले आहेत. जगण्यासाठीचं कोणतंही साधन या नागरिकांकडे नाहीये. प्रशासन या नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भूकंप आणि त्सुनामीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, असं जपानच्या प्रशासनाकडून सांगितलं गेलं आहे.

 

विमानतळावर पळापळ

2011मध्ये जपानमध्ये मोठी त्सुनामी आली होती. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं. त्यानंतर पुन्हा 13 वर्षानंतर जपानमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. समुद्रात पाच मीटर पर्यंत उंचच उंच लाटा उसळताना दिसत आहेत. समुद्राने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. एवढेच नव्हे तर विमानतळावरही घबराट पसरली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा धावताना दिसत आहे. काही एअरपोर्ट कर्मचारी टेबलच्या खाली लपले आहेत. रस्त्यालाही मोठं मोठे तडे गेले आहेत. काही ठिकाणी भगदाड पडल्याने लोक भयभीत झाले आहेत.