अंकारा : काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या देशाला संकट काळात भारतानेच मदतीचा हात पुढे केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्की हा देश पाकिस्तानच्या बाजुने उभा राहिला होता. पण आज जेव्हा या देशावर संकट कोसळलं आहे. तेव्हा भारताकडूनच मदत पाठवण्यात आली आहे. तुर्कीमध्ये भूकंप आल्याने अनेकाचं जीवन उद्धवस्त झालं आहे. अशावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा हात दिला आहे.
तुर्कीमध्ये सोमवारी एका पाठोपाठ एक तीन भूकंपाचे धक्के बसले. ज्यामुळे तुर्की आणि सीरियामध्ये दोन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर दहा हजाराहून अधिक लोकं जखमी झाले आहेत.
तुर्कीमध्ये सोमवारी आलेल्या भूकंपाने एकच खळबळ उडाली. एका धक्क्यातून सावरत नाही तो पर्यंत एकापाठोपाठ एक असे 3 धक्के बसले. ज्यामुळे जवळपास तीन हजार इमारती कोसळल्या. तर दोन हजाराहून अधिक जण दाबली गेली. त्यांना अजूनही ढिगाऱ्या खालून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
6 फेब्रवारी 2023 रोजी सकाळी सव्वा चारच्या सुमारास आणि त्यानंतर पुढे आणखी दोन वेळा आलेल्या भूकंपाने देश उद्धस्त झाला. तीन दिवसापूर्वीच भयंकर भूकंपाचा अलर्ट देण्यात आला होता.सीरीयामध्ये ही ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
भूकंपाच्या धक्क्याने अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. आणि काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. लोकं जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर धावली. ढिगाऱ्याखाली अडकलेली लोकं मदतीसाठी आकांताने ओरडत होती. ढिगाऱ्याखालून येणारे आवाज अंगावर शहारा उभा करणारी होती. लोकांना कळत नव्हतं की, काय करावं. पण जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. अजूनही ढिगाऱ्याखालून लोकांना काढण्याचं काम सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटानंतर लगेचच मदतीचा हात पुढे केला.पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी बैठक बोलवली. ज्यामध्ये मदतकार्यासाठी २ टीम पाठवण्याचं ठरलं. सोबत भारताने मेडिकल टीम देखील पाठवण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफचे 100 जवान भारतातून मदतीसाठी रवाना होणार आहेत. ज्यामध्ये डॉग स्क्वायड देखील असणार आहे.
तुर्कीमध्ये याआधी देखील अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 1999 मध्ये आलेल्या भूकंपात 18000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
ऑक्टोबर 2011 मध्ये आलेल्या भूकंपात 600 लोकांचा मृत्यू झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकट काळात शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, आम्ही या संकट काळात या देशांच्या पाठिशी उभे आहोत.