अबूधाबी: यूएईचे (UAE) राष्ट्रपती (president) आणि अबूधाबीचे शासक शेख खलिफा जायद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचं आज निधन झालं. ते 73 वर्षाचे होते. शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधानामुळे संयुक्त अरब अमिरातने 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपतीच्या निधनामुळे देशाचा झेंडा अर्ध्यावर आणला जाणार आहे. या कालावधीत कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाही. तसेच मंत्रालय, सरकारी विभाग, संघीय आणि स्थानिक संस्थानांचे काम बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाने ही माहिती दिल्याचं स्थानिक मीडियाने स्पष्ट केलं आहे. संयुक्त अरब अमिरात, अरब, इस्लामी राष्ट्र आणि जगभरातील लोकांनी राष्ट्रपती शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शेख खलिफा यांनी 3 नोव्हेंर 2004 मध्ये संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून सत्ता सांभाळली होती. तब्बल 18 वर्ष त्यांच्या हाती यूएईची सत्ता होती.
शेख खलिफा बिन जायद यांना त्यांचे वडील शेख जायद बिन सुल्तान अल नाहयानी यांचे उत्तराधिकारी नेमले होते. त्यामुळे त्यांच्याकडे देशाच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे दिली होती. शेख जायद बिन सुल्तान 1971 पासून देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळत होते. 2 नोव्हेंबर 2004मध्ये त्यांचे निधन झालं होतं. शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
2019मध्ये शेख खलिफा चौथ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते. यूएईच्या सुप्रीम कौन्सिलने त्यांना राष्ट्रपती म्हणून निवडले होते. खलिफा यांनी 3 नोव्हेंबर 2004मध्ये संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
मीडिया वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून शेख खलिफा आजारी होते. आजारपणामुळेच त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. शेख खलिफा यांचा जन्म 1948मध्ये झाला होता. शेख जायद यांचे ते थोरले चिरंजीव होते. ते संयुक्त अरब अमिरातचे दुसरे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती बनल्यानंतर शेख यांनी संघीय सरकार आणि अबू धाबी सरकारचं पुनर्गठन केलं होतं.