मॉस्को | 30 जुलै 2023 : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला करणअयात आला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हा हल्ला युक्रेनने केल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय असतानाच हा हल्ला झाला. रशियाच्या या एअर डिफेन्स सिस्टिमलाही हा हल्ला टाळता आला नाही. या हल्ल्यात दोन इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मॉस्कोच्या महापौरांनीही हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यामुळे रशिया संपूर्णपणे हादरून गेला आहे.
हल्ला होताच खबरदारीचा उपाय म्हणून रशियाने नुकावो एअरपोर्ट बंद केला आहे. मॉस्कोच्या आयक्यू क्वार्टर नावाच्या गगनचुंबी इमारतीवर हा हल्ला झाला आहे. ही इमारत रहिवाशी असून काही सरकारी कार्यालयेही या इमारतीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. मॉस्कोत आणखी एका इमारतीवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक महिला अपार्टमेंटमध्ये झोपलेली दिसत आहे. त्यावेळी अचानक एक ड्रोन इमारतीला येऊन धडक देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनीही या हल्ल्याची पृष्टी केली आहे. मात्र, या हल्ल्यात मोठं नुकसान झालेलं नाही. हा हल्ला आज सकाळी झाला. हा हल्ला होताच रशियन सैन्याने अनेक ड्रोन पाडले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर युक्रेनने हा हल्ला केल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, हल्ला कुणीही केला असला तरी या हल्ल्यामुळे रशियाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपल्या देशात घुसून आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो, या कल्पनेनेच रशिया हादरून गेला आहे.
दोन दिवसांपूर्वी युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रशियन सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला. रशियन सैन्याने मानवरहित विमान नष्ट केलं आहे. कोणतंही नुकसान झालेलं नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाच पाच ड्रोन रशियाने पाडले आहेत. हे ड्रोन युक्रेनचे होते, असंही सांगितलं जात आहे.