saudi support India : भारताने गेल्या १० वर्षात अनेक देशांसोबत मैत्रीचे संबंध आणखी घट्ट केले आहेत. यामध्ये आखाती देशांचा देखील समावेश आहे. भारतासोबत व्यापार वाढवण्यासाठी अनेक देशांमध्ये चढाओढ लागली आहे. ज्यामध्ये सौदी अरेबिया, दुबई या सारख्या देशांचा समावेश आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने भारताला पुढे येऊन पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला देखील स्थान मिळावे यासाठी सौदी अरेबियाने भारताचे समर्थन केले आहे. यूएईकडून मिळालेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परिषदेत सुधारणा करण्याचे आवाहन भारताने केले आहे. त्याला देखील सौदीने पाठिंबा दिला आहे.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा परिषदेत काही सुधारणांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यामध्ये दुहेरी मापदंड न ठेवता विश्वासार्हता असेल तर तसे करणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.
गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीची मागणी करण्यात आली होती. पण याला अमेरिकेने व्हेटो केल्यानंतर सौदी अरेबियाने ही मागणी केली आहे. गाझामध्ये अमेरिकेने दुटप्पीपणा स्वीकारल्याचा आरोपही सौदीने केला आहे. उल्लेखनीय आहे की भारताने वारंवार UNSC च्या विस्ताराची मागणी केली आहे आणि पाच स्थायी सदस्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि फ्रान्स हे UNSC चे पाच स्थायी सदस्य देश आहेत, ज्यांना P-5 राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिका कंबोज यांनी म्हटले की, 188 सदस्य असलेल्या देशांवर केवळ पाच देश किती काळ राज्य करत राहणार हा प्रश्न आहे. हे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारत अद्याप सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही हे साध्य करू, पण ते इतक्या सहजासहजी होणार नाही. भारताला स्थायी सदस्य करण्यासाठी आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि फ्रान्सने देखील पाठिंबा दर्शवला आहे. पण चीनचा याला विरोध आहे.