वॉशिंग्टन – अमेरिकन (US) संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती नैंसी पेलोसी यांचा आजचा मुक्काम तैवानची राजधानी तोईपेईमध्ये असणार आहे. त्या तैवानमध्ये दाखल झालेल्या आहेत. अमेरिकन नौदल आणि हवाईदलाची 24 एडव्हान्स्ड फायटर जेट्स नैंसी यांचे विमान एस्कॉर्ट करीत होती. दुसरीकडे चीनने (China)अमेरिकेला अतिशय गंभीर परिणामांची धमकी देत तैवानच्या सीमेजवळ लष्करी अभ्यास केला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, चीन आणि तैवान (Taiwan)या तिन्ही देशांनी आपल्या फौजांना युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी संध्याकाळी तिन्ही देशांच्या सैन्यदलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
#WATCH | US House of Representatives Speaker Nancy Pelosi arrives in Taipei, Taiwan.
(Source: Reuters) pic.twitter.com/cEgWZUbZ0m
— ANI (@ANI) August 2, 2022
सुरुवातीला थोड्या पिछाडीवर असलेल्या जो बायडेन प्रशासनाने आता चीनशी थेट मुकाबला करण्याची तयारी केली आहे. चीनची पिपुल्स लिबरेशन आर्मीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेलोसी यांचे एयरक्राफ्ट जर तैवानच्या दिशेने गेले तर चिनी एयरफोर्सचे फ्लीट त्याला घेरणार असल्याची माहिती आहे. त्यांना थांबवण्यात येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी चीनच्या एयरफोर्सने सोमवारी आणि मंगळवारी एयरफोर्स आणि नेव्ही ड्रील केल्याची माहिती आहे. चीन किती मोठी कारवाई करु शकेल, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. या क्षेत्रात गेल्या काही काळात, अमेरिकाही तेवढीच ताकदवान झाली आहे.
दुसरीकडे चीनचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका आणि तैवानचे सैन्यही तयारीत असल्याची माहिती आहे. अमेरिका नेव्हीच्या ४ वॉरशिप हाय अलर्टवर तैनात ठेवण्यात आलेले आहेत. तसेच तैवानच्या समुद्री सीमेत त्या गस्त घालीत आहेत. या वॉरशिपवर एफ-१६, एफ ३५ सारखे अत्याधुनिक फायटर जेट्स आणि मिसाईल्स तैनात आहेत. जर चीनने काही कागाळी केली तर अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
चीननेही तयारी केली असून कारवाईसाठी लाँग रेंज हुडोंग रॉकेट आणि रणगाडे तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर तैवानमध्येही चीनचे लष्करी तळ आहेत. त्यांचाही वापर केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन सैन्याचेही चिनी सैन्यांच्या हालचालींवर नजर आहे.
माध्यमांतून आलेल्या काही बातम्यांनुसार, पेलोसी यांच्या दौऱ्याआधीच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे काही सैनिक आणि मिलिट्रीचे टेक्निकल एक्सपर्ट तैवानला पोहचलेले आहेत. मिलिटरीत या तयारीला बूट ऑन ग्राऊंड असे संबोधण्यात येते. दक्षिण चीन समुद्र परिसरात आणि तैवानमध्ये चीनच्या दादागिरीला रोखायचेच, असा पवित्रा आता अमेरिकेने घेतलेला आहे. तैवानमध्ये अमेरिकेचे सैनिक आहेत की नाहीत, याचा खुलासा अद्याप अमेरिकेने केलेला नाही. याबाबत पेंटागनच्या प्रवक्त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिलेली आहे. ते म्हणालेत की- अमेरिका पेलोसी यांच्या दौऱ्यावरुन राजकारण करीत आहे. ते आगीशी खेळत आहेत. अमेरिकेला याची किंमत चुकवावी लागेल. याचे परिणाम चांगले होणार नाहीत.
चीन वन चायना धोरणानुसार तैवानला आपला प्रदेश मानतो. तर दुसरीकडे तैवान स्वताला स्वतंत्र देश म्हणवून घेतो आहे. तैवानने चीनच्या राजकीय मागण्यांसमोर झुकावे आणि चीनचा कब्जा मानावा, यासाठी चीन तैवानवर दबाव टाकीत आहे. दुसरीकडे अमेरिका चीनच्या वन चायना धोरणाला मानते, मात्र त्यात तैवान नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.