अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतील. अमेरिकेत मतदानासाठी फक्त EVM मशीनचा नाही, तर बॅलेट पेपरचा सुद्धा वापर होणार आहे. बहुतांश मतदारांचा बॅलेट पेपरवर विश्वास आहे. काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी सुद्धा मशिनने मतदान करण्याला विरोध केला होता. मशिनला आरामात हॅक करता येतं, असं मस्क म्हणाले होते. बॅलेट पेपर बरोबर हे शक्य नाहीय. अमेरिकेसह अनेक देशात EVM मशीन नाही, तर बॅलेट पेपरने मतदान होतं. यामागे एकमेव कारण म्हणजे विश्वाहर्ता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची भारतातील लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास दोघांमध्ये खूप अंतर आहे. भारतात मतदानाच्या 36 तास आधी प्रचाराच्या तोफा थंडावतात. तेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अंतिम टप्प्यात मतदानाच्या मुख्य तारखेच्या आधीच मतदान सुरु होतं. भारताच्या पोस्टल बॅलेट प्रक्रियेसारखं हे मतदान असतं.
अमेरिकेत मुख्य तारखेच्या आधी होणाऱ्या वोटिंग प्रक्रियेला अर्ली-वोटिंग म्हटलं जातं. यात मतदार मेल-इन-बॅलेट द्वारे मतदान करतो. आतापर्यंत अमेरिकेत 7.21 कोटीपेक्षा अधिक मतदारांनी प्रारंभिक मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मंगळवारी मतदार राज्यात बनवलेल्या बूथवर जाऊन मतदान करतील. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदान बॅलेटने होतं. वर्ष 2000 मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदानाची प्रक्रिया थोडी वेगळी होती. बॅलेट पेपरसह पंच-कार्ड वोटिंग मशीनने मतदान व्हायचं.
DRE मशिनची खरेदी बंद केली
पण या द्वारे होणारं मतदान वादात सापडलं. फ्लोरिडामधील निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. रिपब्लिकन उम्मीदवार जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अल गोर यांना 537 मतांच्या अंतराने हरवलं. ही निवडणूक इतकी वादग्रस्त ठरली की, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला रिकाऊंटिंगची प्रोसेस थांबवून मध्येच बुश यांना विजेता घोषित करावं लागलं. त्यानंतर अमेरिकेत 2002 साली मतदान सुधारणेसाठी एक विधेयक मंजूर झालं. हेल्प अमेरिका वोट एक्ट पास होताच सरकारने अब्जो डॉलर खर्चून ‘डायरेक्ट रिकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक’ (DRE) मशिनची खरेदी बंद केली. कारण या मशीनद्वारे होणाऱ्या वोटिंगसाठी कुठलाही पेपर ट्रेल नव्हता.
यंदाच्या निवडणुकीत किती टक्के लोक EVM ने मतदान करतील?
अमेरिकेतील बुहतांश राज्य जुन्या पद्धतीने बॅलेटने मतदान करण्याला प्राधान्य देत आहेत. 2022 साली मिड-टर्म निवडणुकीत 70 टक्के रजिस्टर्ड वोटर्सनी हँड मार्क्ड पेपर बॅलेटचा वापर केलेला. यात 23 टक्के लोक अशा राज्यात राहतात, जिथे लोकांना इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा बॅलेट दोघांपैकी एकामार्गाने उमेदवार निवडण्याच स्वातंत्र्य आहे. मिड-टर्म निवडणुकीत अवघ्या 7 टक्के लोकांनी DRE मशिनद्वारे वोटिंग केलं होतं. हा आकडा आत कमीकमी होत चालला आहे. अमेरिकेतील नागरिकांचा बॅलेट पेपरवर जास्त विश्वास आहे. BrennanCenter.org च्या डाटानुसार, 2024 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 98 टक्के लोक बॅलेट पेपरचा वापर करतील. 2020 मध्ये हा आंकडा 93 टक्के होता. बॅलेट पेपरद्वारे मतदान होत असल्यामुळेच अमेरिकेत मतमोजणीला काही दिवस लागतात.