बांगलादेशचा भळभळता इतिहास, वाचा आतापर्यंतच्या A टू Z घडामोडींची माहिती

| Updated on: Aug 11, 2024 | 9:59 PM

मुक्तीवाहिणीला बंगाली भाषेत स्वातंत्र्यासाठी लढणारी फौज म्हटलं जातं. त्यावेळी बांगलादेशच्या मदतीला एकही बडा देश धावला नाही. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मुक्तीवाहिनीला जाहीर पाठिंबा दिला आणि 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे होवून स्वतंत्र बांग्लादेश तयार झाला.

बांगलादेशचा भळभळता इतिहास, वाचा आतापर्यंतच्या A टू Z घडामोडींची माहिती
Follow us on

शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार सुरु झालं आहे. पॅरिसहून मोहम्मद युनूस बांगलादेशात परतताच हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा होता म्हणून त्यांनी आवाहन केलं. मात्र लोकांचं हित न जोपासलं गेल्यास दुसरं स्वातंत्र्य व्यर्थ ठरेल, असंही ते म्हणाले. जेव्हा भारतापासून पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान दोन वेगवेगळ्या गटात होता. एक पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान. दुसरा पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचा बांग्लादेश. युद्ध झाल्यास एकाच वेळी दोन भौगोलिक स्थितीवर तोंड देणं भारतासाठी अडचणीचं होतं. पुढे भाषेपासून ते विविध मुद्द्यांवरुन पश्चिम पाकिस्तानला पूर्व पाकिस्ताननं सापत्न वागणूक सुरु केली. त्याविरोधात शेख हसीनांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांच्या पुढाकारानं बांग्लादेश स्वातंत्र्यासाठी मुक्तिवाहिनी उभी राहिली. मुक्तीवाहिणीला बंगाली भाषेत स्वातंत्र्यासाठी लढणारी फौज म्हटलं जातं. त्यावेळी बांगलादेशच्या मदतीला एकही बडा देश धावला नाही. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मुक्तीवाहिनीला जाहीर पाठिंबा दिला आणि 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे होवून स्वतंत्र बांग्लादेश तयार झाला.

मात्र आज ज्या मुजीबूर रहमान यांच्या पुढाकारानं बांग्लादेश स्वातंत्र्य झाला त्यांच्याच मुलीची सत्ता संपुष्ठानंतर हा दुसरा स्वातंत्र्यदिन असल्याचं मोहम्मद युनूस यांनी म्हटलंय. पण जरी हे स्वातंत्र्य मानलं तरी ते कुणाच्या हाती जाईल? हा प्रश्न भारतासाठी चिंतेचा असेल. कारण, 84 वर्षीय मोहम्मद युनूस हंगामी सरकार किती क्षमतेनं सांभाळणार? त्यांच्या आडून बांगलादेशात सैन्यशासनच कारभार पाहणार का? हसीनांच्या तख्तापलटानंतर मुस्लिम कट्टरपंथीय संघटनांना सरकार बळ देणार का? असे प्रश्न भारतासाठी महत्त्वाचे आहेत.

हंगामी सरकार मोहम्मद युनूस सांभाळणार

एकीकडे हसीनांची सत्ता गेलीय. दुसरीकडे निवडणुका होईपर्यंत हंगामी सरकार मोहम्मद युनूस सांभाळणार आहेत, आणि बांग्लादेशात फक्त बीएनपी अर्थात बेगम खालिदा जियांचा पक्ष या घडीला सर्वाधिक मोठा पक्ष आहे. त्यामुळे हंगामी सरकारनंतर जियांचा बांग्लादेश नॅशनल पार्टी अर्थात बीएनपीकडे सत्ता जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हसीना यांचा आवाम लीग पक्ष उदारमतवादी मानला जातो. तर जियांचा बीएनपी कट्टरतावादी पक्ष आहे. हसीनांचा आधीपासून भारतासोबत दृढ संबंधावर विश्वास होता. बीएनपी भारताऐवजी चीन-पाकिस्तानला जवळचा मानत आलाय. हसीनांची धोरणांचा कल हा भारताकडे झुकणार होता. तर बीएनपी पक्षावर चीनधार्जिणं असल्याचा आरोप होतो.

कधी काळी मोहम्मद युनूस हे हसीनांचे वडील मुजीबूर रहमानांचे समर्थक होते. युनूस राजकारणात आल्यानंतर मात्र हसीनांशी त्यांचं फार सख्य जुळलं नाही. एक वेळ अशीही होती, जेव्हा हसीना यांनी मोहम्मद युनूस यांना गंगेत बुडवलं पाहिजे म्हणून विधान केलंय. मात्र कालचक्रानं हसीनांचीच राजवट बुडवून ती मोहम्मद युनूस यांच्या हाती सोपवली.

कोण आहेत मोहम्मद युनूस?

मोहम्मद युनूस सामाजिक कार्यकर्ते, बँकर आणि अर्थशास्री आहेत. 2006 ला त्यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळाला. तो सन्मान त्यांनी गरिबी हटवण्यासाठी खर्च केला. गरिबांचे बँकर म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. 2007 ला नागरिक शक्ती म्हणून पक्षही स्थापन केला होता.

दरम्यान, आवामी लीग बांग्लादेशात नसेल तर लोकशाहीही राहणार नाही, असा इशारा हसीना यांच्या मुलानं दिलाय. बांगलादेशातल्या हिंदूंवर होणारे अत्याचार रोखणं भारताचं मुख्य लक्ष्य आहे. स्थानिक विद्यार्थी संघटना अल्पसंख्याकांचं रक्षणासाठी उतरल्या आहेत. मात्र जमातसारख्या कट्टरतावादी संस्था हिंदूंच्या घरांना लक्ष्य करत आहेत.

हसीनांविरोधात बांग्लादेशात असंतोष आहे, त्यांनाच भारतानं तात्पुरत्या आश्रय दिल्यामुळेही बांग्लादेशात राग असल्याचा दावा मोहम्मद युनूस यांनी केला होता. दुसरीकडे हसीना आता कोणत्या देशात आश्रयाला जाणार हे स्पष्ट नाहीय. शेख हसीना यांच्या भारतातल्या वास्तव्यावर पुढचं नियोजन काय असेल, असाही प्रश्न सरकारला करण्यात आला. त्यावर भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही”, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या उत्तरात सांगितलं.

53 वर्षांपूर्वी भारतानंच बांग्लादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य दिलं होतं. तिन्ही बाजूंनी भारतीय भूभागाशी घेराव. भारतासोबतचा व्यापार आणि भारताची गरज बांग्लादेशला कालही होती आणि उद्याही असणार आहे. फक्त 1971 ला ज्या पाकिस्तानातून बांग्लादेश वेगळा झाला, त्याच बांग्लादेशची सत्ता पुन्हा कट्टरतावाद्यांच्या हाती जाणार नाही ना, याची दक्षता भारताला घ्यावी लागणार आहे.