नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : भारताचे चंद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून अवकाशातून झेपावल्याच्या नंतर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियातील एका समुद्र किनारी एक रहस्यमय वस्तू सापडली होती. या वस्तूच्या अचानक समुद्र किनारी सापडल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. नक्की ही घुमटाकार दिसणारी वस्तू काय आहे ? या वस्तूला भारताच्या चंद्रयान-3 ला जोडून पाहीले जात होते. या विषयी नाना तर्क वितर्क केले जात होते. दरम्यान याबाबत इस्रोने मोठा खुलासा केला आहे.
भारताचे चंद्रयान-3 नुकतेच 14 जुलै रोजी अवकाशात झेपावले. त्यानंतर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर एक मोठी वस्तू अचानक सापडल्याने खळबळ उडाली होती. ऑस्ट्रेलिया अंतराळ एजन्सी एएसए ने सोमवारी सांगितले की ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर सापडलेली वस्तू भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या रॉकेटच्या भाग आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देखील हा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान ( पीएसएलव्ही ) रॉकेटचा हा एक भाग असू शकतो असे म्हटले आहे. पीएसएलव्ही हे भारताचे सर्वाधिक विश्वासार्ह रॉकेट आहे. इस्रोने पीएसएलव्हीने आतापर्यंत 58 प्रक्षपण मोहीमा केल्या आहेत. अशा प्रकारे रॉकेटचा भाग सापडण्याची ही काही पहिली घटना नाही.
इंग्रजी वृत्तपत्र इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानूसार इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते ऑस्ट्रेलियात सापडलेला भाग पीएसएलव्ही रॉकेटचा अर्धवट जळालेला भाग असू शकतो. दोन महिन्यांपूर्वी याच्या मदतीने आयआरएनएसएस ग्रुपसाठी नेव्हीगेशन उपग्रहांचे लॉंचिंग केले होते. उपग्रहांना दक्षिण दिशेकडे प्रक्षेपित केले होते. पृथ्वीच्या वातावरणात येताना रॉकेटचा भाग पूर्णपणे जळाला नसावा आणि तो समुद्रात पडला असावा तसेच ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर तो वाहत आला असावा. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सीने इस्रोच्या या यानाचा तुकडा स्टोअर केला आहे. आता इस्रोने या संदर्भात पुढे काय करणार हे सांगितलेले नाही.
अंतराळातून एखादी वस्तू पडल्याने प्राणघातक हानी होऊ शकते. महासागरात अशा वस्तू पडल्याने समुद्री जीवांसह प्रदुषणात वाढ होऊ शकते. पृथ्वीवर सत्तर टक्के समुद्राचे पाणी असल्याने अंतराळातून निकामी उपग्रह किंवा यान वा रॉकेटचे भाग समुद्रातच बहुतेक वेळा कोसळतात. आतापर्यंत अंतराळातून काही पडल्याने कोणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मे 2021 मध्ये 25 टनाच्या चीनी रॉकेटचा भाग हिंद महासागरात कोसळला होता. साल 1970 च्या दशकात रशियाची स्कायलॅब अंतराळ प्रयोगशाळा कोसळण्याची घटना आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेली घटना आहे.
अंतराळातील उपग्रह किंवा रॉकेटचा भाग परदेशातील भूमीवर कोसळल्याने त्याने कोणतीही वित्त किंवा जिवीतहानी झाली तर त्याची भरपाई संबंधित देशाला त्या देशाला द्यावी लागते. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नियम आणि संकेत तयार केलेले आहेत.