पृथ्वी पलीकडचं विश्व म्हणजे अवकाश. या अवकाशाचं मानवी मनाला नेहमीच कुतूहल वाटत आलय. अवकाशात पृथ्वीसारखं वातावरण नाहीय. तिथे माणूस राहू शकतो का? अवकाशात माणूस का तरंगतो? असे अनेक प्रश्न मानवी मनला पडतात. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका, रशिया, चीन, भारत तसच इतर देश अविरतपणे अवकाश संशोधनाच कार्य सुरु आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा या रिसर्चमध्ये आघाडीवर आहे. मागच्या काही वर्षातील संशोधनातून अवकाशातील बरीच रहस्य उलगडली आहेत. पण अजूनही हा शोध संपलेला नाहीत. अवकाशातील सर्व रहस्य समजली, असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण अवकाशाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, दरवर्षी अवकाशासंबंधी काही ना काही नवीन माहित समोर येत असते. अवकाश संशोधन हा फक्त आता शोधापुरता मर्यादीत राहिलेला विषय नाही. अवकाश संशोधन क्षेत्रात आता स्पर्धा सुरु झाली आहे. अवकाश संशोधन हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सर्वात पहिलं कोण पोहोचणार? किंवा कुठला देश अवकाशातील नवीन गोष्ट शोधून काढणार? याची स्पर्धा लागली आहे.
नेहमीच वेगवेगळ्या देशांची अवकाश मिशन्स सुरु असतात. अवकाशाचा विषय पुन्हा चर्चेत येण्यामागच कारण आहे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर. 5 जूनला बोइंगच्या स्टारलायनर यानाने हे दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पोहोचले. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था NASA च हे मिशन 10 दिवसांच होतं. म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे 15 जूनपर्यंत पृथ्वीवर परतले पाहिजे होते. लेट म्हणजे जास्तीत जास्त 25 जून समजू. पण हे दोन्ही अंतराळवीर अजूनही पृथ्वीवर परतलेले नाहीत. ते तिथेच अडकून पडले आहेत. सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यामुळे भारतीयांना त्यांच्याबद्दल जास्त आत्मीयता वाटणं, त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर अडकून पडण्याच कारण आहे, बोईंगच्या स्टारलायनर यानामध्ये झालेला बिघाड. 58 वर्षीय सुनीता विलियम्स स्टारलायनरच्या पायलट होत्या तर बुच विल्मोर मिशनचे कमांडर. सुनीता विलियम्स यांची ही तिसरी अंतराळी मोहीम आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत कसं आणणार? काय पर्याय आहेत? त्यावर नासामध्ये विचारमंथन सुरु आहे. अवकाशात जाताना वातावरणाची कक्षा भेदून जावी लागते तसच अवकाशातून वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणं सुद्धा सोपं नाहीय. हाच सर्वात मिशनमधला कठीण टप्पा आहे.
जास्त दिवस अवकाशात राहिल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
अवकाशात राहणं सोपं नाहीय. कारण तिथे वातावरण नसतं. अंतराळवीर म्हणून अवकाशात जाण्याआधी विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. अमेरिका, रशिया या दोन देशांमध्ये अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था आहे. भारताच्या ‘गगनयान’ मिशनमधील चारही पायलट्सनी रशियात प्रशिक्षण घेतलं आहे. पृथ्वीवरील वातावरणाला अनुकूल अशी मानवी शरीराची रचना आहे. अवकाशात बिलकुल या उलट स्थिती आहे. दीर्घकाळ अवकाशात वास्तव्य केल्यास शारीरिक दृष्ट्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ठरलेल्या दिवसांपेक्षा अवकाशात जास्त काळ वास्तव्य करावं लागल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सुनीता विलियम्स यांना याची कल्पना आहे. अवकाश यानातील बिघाडामुळे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर याचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील मुक्काम वाढला आहे. याचं कुठलही नियोजन केलेलं नव्हतं. आता त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे शरीरात काय बदल होतात?
अवकाशात अत्यंत सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असतं. मानवी शरीराची रचना ही अशा वातावरणासाठी झालेली नाही. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ वरच्यादिशेने जातात. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांच संतुलन बिघडतं. त्यामुळे डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणं) किंवा द्रवपदार्थाचा ओव्हरलोड (म्हणजे जास्त जमा होणं) अशा समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत शरीरात किडनीला व्यवस्थित कार्य करता येत नाही. किडनी स्टोनचा धोका वाढतो. किडनीचे अन्य आजार होऊ शकतात. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे वेगाने शरीरातील स्नायू आणि हाडांच नुकसान होऊ शकतं. शरीराची रचना कमकुवत होते. फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांना काय धोका?
अवकाशातील दीर्घकाळ वास्तव्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे शरीरात डोक्याच्या दिशेने वाढणारं द्रव्याच पुनर्वितरण. त्यामुळे इंट्राक्रॅनियल दबाव वाढतो. शरीरात एकाबाजूला दबाव वाढल्यामुळे दृष्टी कमी होते, डोकेदुखी वाढते आणि स्मरणशक्तीची समस्या निर्माण होते. अवकाशात हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर सुद्धा परिणाम होतो. पृथ्वीवरच्या वातावरणात आपलं ह्दय जसं कार्य करत, अवकाशात तशी स्थिती नसते. तिथे जास्त दिवस राहिल्यास वजन नसलेल्या वातावरणात ह्दयाच्या कार्य पद्धतीत, काम करण्याची रचना बदलू शकते.
कॅन्सरची शक्यता का वाढते?
अवकाशात अंतराळवीरांना दुसरा गंभीर धोका किरणोत्सर्गापासून आहे. कॉस्मिक रे आणि अन्य किरणोत्सार थेट अवकाश यानाला भेदून आतामध्ये शिरतात. हा किरणोत्सर्ग पृथ्वीवरच्या वातावरणापेक्षा जास्त असतो. हा किरणोत्सर्ग थेट शरीराला भिडत असल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. तीव्र विकिरणामुळे आजारपण येतं. रेडिएशनमुळे मेंदूच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. स्मरणशक्ती कमी होते. अन्य न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम वाढतात.
मायक्रोबायोटा म्हणजे काय?
अवकाशात रोगप्रतिकारक शक्ती ढासळू शकते. अंतराळवीरांना इनफेक्शन म्हणजे संसर्गाची लागण होण्याचा धोका वाढतो. गुरुत्वाकवर्षणाच्या अभावामुळे शरीरातील मायक्रोबायोटावर परिणाम होतो. मायक्रोबायोटा म्हणजे सूक्ष्मजीवांचा समुदाय. माणसाच्या आरोग्यात या मायक्रोबायोटाची भूमिका खूप महत्त्वाची असते. मायक्रोबायोटामधील बदलामुळे पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिमाण होऊ शकतो. एकूणच ठरलेल्या कालावधीपेक्षा अवकाशातील जास्त दिवसांच्या मुक्कामामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शरीराची मोठी हानी होऊ शकते.
मानसिक दृष्टया काय परिणाम होतो?
मिशन कालावधी वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही. अवकाशात माणसाला एकटेपणा जाणवू शकतो. बंदिवान असल्यासारखी स्थिती असते. सततची काळजी, चिंता, विचार यामुळे नैराश्य येऊ शकतं. जवळच्या माणसांपासून लांब राहिल्यामुळे भावनिक दृष्ट्या माणूस कमकुवत होतो. पृथ्वीवर परतल्यानंतरही हे परिणाम जाणवतात. नासा समोर आता सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणं हा एकच विषय नाहीय, तर त्यांच्या आरोग्याचे प्रश्न हे सुद्धा एक गंभीर आव्हान आहे.
दोन कंपन्यांमधल भांडण
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यावरुन नासा आणि बोईंगच्या अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला, असं वृत्त काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जनरल’ने दिलं होतं. स्टारलायनरवरुन नासा आणि बोईंगच्या अधिकाऱ्यांमध्ये एकमत झालं नाही. आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरुन दोन्ही अंतराळवीरांना स्टारलायनर सुरक्षित पृथ्वीवर परत घेऊन येईल असा बोईंगला विश्वास आहे. पण नासाच्या वैज्ञानिकांना कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. दोन कंपन्यांमधला वाद हे सुद्धा सुनीला विलियम्स आणि बुच विल्मोर यांचा अवकाशातील मुक्काम वाढण्यामागचं एक कारण आहे. नासाने अजून मिशनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला नाही. बोईंगसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. एयरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये बोईंग एक मोठं नाव आहे. नासाने मिशन चेंज केलं, तर बोईंग आपल्या स्टारलायनर यानाला अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर आणू शकते. स्टारलायनरमध्ये तशी सिस्टिम आहे. पृथ्वीवरुन कमांड दिल्यानंतर स्टारलायनर ते आदेश घेऊन अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने येऊ शकतं.
नासाकडे दुसरा ऑप्शन काय?
एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच सुद्धा क्रू ड्रॅगन मिशन आहे. क्रू ड्रॅगन सुद्धा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर जाणार आहे. या मिशनमध्ये सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचा समावेश केला जाऊ शकतो. नासाने बोईंगऐवजी स्पेसएक्सच्या मिशनद्वारे सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला, तर फेब्रुवारी 2025 पर्यंत थांबावं लागेल. म्हणजे सुनीता विलियम्स यांचा अवकाशातील मुक्काम आठ महिन्यांचा होईल. आता दोन महिन्यानंतरच सुनीता यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हा तर खूप मोठा कालावधी होतो. सुनीता विलियम्स यांना स्पेसफ्लाइट एसोसिएटेड न्यूरो-ऑकुलर सिंड्रोम नावाचा आजार झालाय. डोळ्यांच्या दृष्टी संदर्भातील हा आजार आहे. सुनीता विलियम्स यांची दृष्टी कमी झालीय. त्यांना धुरकट दिसू लागलय. विलियम्स यांच्या कॉर्निया, रेटिना आणि लेंसच स्कॅनिंग करण्यात आलं. आजार कितपत बळावलाय ते जाणून घेण्यासाठी हे स्कॅनिंग करण्यात आलं. मायक्रोग्रॅविटी म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे आरोग्याची ही समस्या निर्माण झाली आहे. अवकाशात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे आरोग्यावर काय-काय परिणाम होऊ शकतो, त्याची माहिती वरती लेखात दिलीच आहे.
National Space Day – 2024
🇮🇳 Jai Hind…
A testament to Aatmanirbhar Bharat#NSpD2024 @DrJitendraSingh pic.twitter.com/jRuogExFi2— ISRO (@isro) August 15, 2024
यान बदलल्यामुळे स्पेससूट सुद्धा बदलावा लागतो का?
स्पेसएक्सच क्रू 9 मिशन ऑगस्टमध्ये लॉन्च होणार होतं. पण सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन हे मिशन 25 स्पटेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. क्रू 9 मिशनद्वारे 4 अंतराळवीर अवकाशात जाणार होते. पण सुनीत विलियम्स आणि बूच विल्मोर यांना परत आणायच असल्याने आता क्रू 9 मिशनद्वारे दोनच अंतराळवीर ISS वर पाठण्यात येतील. मग फेब्रुवारीमध्ये चौघांना एकत्र पृथ्वीवर आणण्याचा दुसरा पर्याय आहे. नासासमोर एक आव्हान स्पेससूटच सुद्धा आहे. बोइंगच्या स्टारलायनरसाठी डिजाइन केलेला स्पेससूट स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनमध्ये चालणार नाही. त्यामुळे सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांच्यासाठी क्रू-9 ड्रॅगनमधून अतिरिक्त स्पेससूट पाठवावा लागेल.