चीनचे ‘मिशन मून – 2030’ नेमकं काय आहे? चंद्रावरुन चीनने 2 किलो माती का आणली ?

| Updated on: Jun 27, 2024 | 9:50 PM

चीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन दोन किलो माती आणली आहे. चीनचे 'मिशन मून - 2030' पूर्ण करण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. चीनमध्ये चंद्रावरुन आणलेल्या मातीवर संशोधन केले जात आहे.

चीनचे मिशन मून - 2030 नेमकं काय आहे? चंद्रावरुन चीनने 2 किलो माती का आणली ?
CHINA MOON MISSION
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 अंतर्गत सॉफ्ट लॅंडीग करुन अनोखा विक्रम केला होता. आता चीनने  Chang’e-6 probe यानातून नुकतीच चंद्राच्या अंधाऱ्या भागातूनच दोन किलो माती आणून नवा इतिहास घडविला आहे. ही माती 4 अब्ज वर्षे जुनी असल्याचे म्हटले जात आहे. चंद्रावरून माती आणण्याची मोहीम सोपी नव्हती. चीनने ही माती ड्रिलिंग आणि रोबोटिक आर्म्सद्वारे गोळा केली होती. त्यानंतर ही माती एका मोठ्या कॅप्सूलमध्ये टाकून री-एंट्री व्हेईकलच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यात यश मिळविले होते. चीन चंद्रावरून आणलेल्या या मातीचे नेमके काय करणार ? यातून चीनला काय फायदा होणार आहे ? पाहूयात

या मातीत काय आहे ?

चंद्रावरुन आणलेली माहीती अतिशय महत्वाची ठरणार आहे. आपल्याला चंद्राची जी बाजू नेहमी दिसते तेथील ही माती नसून चंद्राच्या कधीही न दिसलेल्या भागातील ही माती आहे. चंद्राचा तो भाग, जो पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. चंद्रावर जाणारे अंतराळवीर पृथ्वीवरून दिसणाऱ्या भागातच उतरतात. परंतु चंद्राचा न दिसणाऱ्या भागात अनेक रहस्य लपलेली आहेत. या भागाबद्दल फारच कमी माहिती मानवाला झाली आहे. चंद्रावर पाणी बर्फाच्या रूपात साठवलेले असल्याचे शास्रज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रावर जर पाणी असल्याचे सिद्ध झाल्यास चंद्रावरही जीवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

या मातीतून चीनला काय मिळणार?

आता चीनला या मातीचे परिक्षण करुन चंद्राच्या डार्कबाजूला बर्फ आहे का ? हे शोधायचे आहे. याशिवाय चीन या मातीच्या अभ्यासातून चंद्राची निर्मिती नेमकी कशी आहे? चंद्र तयार कसा झाला आणि त्याचा भौगोलिक इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे संशोधन खूप महत्त्वाचे ठरू शकते. चीनने एक रोबोट तयार केला असून ज्याचे नाव आहे ‘चायनीज सुपर मेशन’ आहे. हा रोबोट चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर भविष्यात चीन चंद्रावर काही बांधकाम करण्याची शक्यता आहे.

चीनचे मिशन 2030

चीन आणि रशिया यांनी साल 2021 मध्ये चंद्रावर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बांधण्याचा करार केला आहे. चीन रशियाच्या मदतीने साल 2030 पर्यंत चंद्रावर अणु प्रकल्प उभारणार आहे. चंद्रावरून माती आणणे हे चीनचे त्याच दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे मानले जाते. रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटले आहे की चंद्रावर अणु प्रकल्प उभारणे हे सोपे काम नाही. याकामासाठी चंद्रावर मानव पाठवले जाणार नाहीत. तर हा प्लांट केवळ मशिनच्या सहाय्याने बांधला जाणार आहे. चीन 2030-33 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचा विचार करीत आहे.