What is Hamas : इस्रायलला घाम फोडणारी ‘हमास’ काय आहे? पंगा का? कोणती शपथ घेतलीय?; वाचा इन्साईड स्टोरी

| Updated on: Oct 08, 2023 | 1:22 PM

पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला केला आहे. गाजा पट्टीवरून हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. हमासकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.

What is Hamas : इस्रायलला घाम फोडणारी हमास काय आहे? पंगा का? कोणती शपथ घेतलीय?; वाचा इन्साईड स्टोरी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तेल अवीव | 8 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टाईनने काल शनिवारी इस्रायलवर पहाटे पहाटेच जोरदार हल्ला चढवला. पॅलेस्टाईनच्या हमास (Israel-Palestine conflict ) या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर शंभर दीडशे नव्हे तर 5 हजार रॉकेट डागले. अचानक झालेल्या या बॉम्ब वर्षावामुळे इस्रायलमधील अनेक इमारती जमीनदोस्त झाली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यात 300 इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर हमासच्या (What is Hamas) अतिरेक्यांनी इस्रायल सैनिकांच्या तळांवर हल्ले करून या सैनिकांसह इस्रायली नागरिकांनाही ओलीस धरलं आहे. पॅलेस्टाईनच्या या हल्ल्याने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. तर इस्रायलनेही पॅलेस्टाईन विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोकांना किती अमानुषपणे मारलं गेलंय हे दिसून येत आहे. तसेच बॉम्बच्या वर्षावाने इस्रायलची कशी वाताहत झालीय हेही दिसून येत आहे. एवढा हिंसाचार, मृत्यूचं एवढं तांडव इस्रायलच्या नागरिकांनी कधीच पाहिलं नव्हतं. या हल्ल्याने इस्रायलच्या नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.

हमासचं नाव काढताच अनेकांचे पाय लटपटत आहेत. इस्रायलवरील हल्ल्यानंतर हमास पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका बलाढ्य देशावर हल्ला करणारी हमास काय आहे? ही संघटना देशापेक्षा वरचढ कशी ठरली इस्रायलच्या सर्व सुरक्षा, सर्व गुप्तचर यंत्रणांची ऐशीतैसी करत हमासने इस्रायलवर हल्ला कसा चढवला? असा सवाल केला जात आहे.

हमासची शपथ काय?

हमास ही पॅलेस्टाईन इस्लामी दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचा गाजा पट्टीवर ताबा आहे. हमासने इस्रायलला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतलेली आहे. 2007मध्ये गाजामध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर इस्रायलसोबत हमासने अनेकवेळा युद्ध केले.

या युद्धांमध्ये हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. इतर घातल हल्लेही केले. त्याला इस्रायलने तोडीस तोड देताना अनेकदा हवाई हल्ले केले. इजिप्तसोबत मिळून इस्रायलने सुरक्षेसाठी 2007मध्ये गाजा पट्टी ब्लॉक केली होती.

हमास काय आहे?

  1. हमास म्हणजे इस्लामी प्रतिरोध आंदोलनाची स्थापना 1987मध्ये पहिल्या पॅलेस्टाईन इंतिफादाच्या वेळी झाली होती. इंतिफादाचा अर्थ बंड करणे. उठाव करणे असा आहे. ईराणमध्ये इंतिफादाला बळ दिलं जातं. ही विचारधारा मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारधारेशी सुसंगत आहे. मुस्लिम ब्रदरहूडची स्थापना 1920मध्ये इजिप्तमध्ये करण्यात आली होती.
  2. इस्लामिक राज्य आणणे आणि इस्रायलचा विनाश करणे हा हमासच्या स्थापने मागचा हेतू आहे. अहमद यासीन याने हमासची स्थापना केली होती. विशेष म्हणजे यासिन हा अपंग होता. वयाच्या 12 व्या वर्षापासून तो व्हिलचेअरवरच होता. व्हिलचेअरवर कायम असलेल्या माणसाने या संघटनेची स्थापना केली आणि 1987मध्ये थेट इस्रायलच्या विरोधात बंडाची घोषणा केली होती.
  3. 2007मध्ये हमासने वेस्ट बँकमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनाजेशन (पीएलओ)चे प्रमुख आणि राष्ट्रपती महमूद अब्बास यांना गृह युद्धात धडा शिकवला होता. त्याआधी 2006मध्ये झालेल्या पॅलेस्टाईनच्या संसदीय निवडणुकीत हमासने मोठा विजय मिळवून गाजावर ताबा मिळवला होता.
  4. गाजामध्ये झालेली ती शेवटची निवडणूक होती. त्यानंतर निवडणूक झाली नाही. हमासने महमूद अब्बासवर षडयंत्राचा आरोप ठेवला. तर, हमासने गाजामध्ये लोकशाहीमार्गाने सरकार स्थापन केलं नाही तर हमासने सरकार उलथवलं, असा दावा अब्बास यांनी केला होता.
  5. गाजामध्ये सत्तेत आल्यानंतर हमासने अनेकवेळा इस्रायलसोबत युद्ध केलं. गाजाहून इस्रायलवर रॉकेट हल्ला करणं हे हमासच्या हल्ल्याचं वैशिष्ट्ये आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही हवाई हल्ले केले जातात.
  6. हमास इस्रायलला मान्यता देत नाही. तसेच 1990च्या दशकात इस्रायल आणि पीएलओ दरम्यान झालेल्या ओस्लो शांती करारालाही हमासकडून विरोध केला जात असतो. विशेष म्हणजे हा विरोध हिंसक असतो. हमासकडे इज अल दीन अल कसम ब्रिगेड नावाची एक सशस्त्र विंग आहे. या विंगने इस्रायलमध्ये अनेक बंदूकधारी आणि आत्मघाती हल्लेखोर पाठवले आहेत.
  7. इस्रायलसह अमेरिका, यूरोपियन संघ, कॅनडा, इजिप्त आणि जापाननेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर ईराण, सीरिया आणि लेबनानचं हमासला पाठबळ आहे. या देशातील हिजबुल्लाह ही इस्लामी संघटना मध्यपूर्व, इस्रायल आणि अमेरिकेच्या धोरणाचा विरोध करते. त्यामुळे हमासही या धोरणांचा विरोध करते.
  8. गाजा हे हमासच्या शक्तीचं केंद्र आहे. पॅलेस्टाईनमध्येही हमासचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहे. हमासचे नेते कतारसहीत मध्य पूर्व देशात ठाण मांडून आहेत. हमासने शनिवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.