जेरुसलेम 9 ऑक्टोबर 2023 : हमास संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या युद्धात सारं जग होरपळून निघतंय. मात्र ज्या इस्रायलकडे सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं, त्या देशावर हल्ला कसा झाला? आयर्न डोम नावाची यंत्रणा हमासच्या मिसाईल्सनी कशी भेदली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले होतायत. दोन्हीकडच्या रहिवाशी भागांवर हल्ले होतायत. रस्ते-चौक आणि निवासी भाग युद्धभूमीत बदलले आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीतल्या एका इमारतीवर हल्ला झाला, आणि काही क्षणात इमारत बेचिराख झाली. आकाशात काळोख, चहूबाजूंनी येणारे हल्ल्यांचे आवाज आणि भेदरलेले लोक हेच चित्र दोन्हीकडे आहे.
इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेलाय. इस्रायल हा जेमतेम 95 लाख लोकसंख्येचा देश आहे. आणि त्याच्या चारही बाजूला शत्रूराष्ट्र. मात्र यावेळी हमास या संघटनेच्या हल्ल्यामागे इस्रालच्या आयर्न डोमबाबत शंकाही उपस्थित होतायत. इस्रायलचं आयर्न डोम काही भागात सक्रीय होतं. मात्र काही भागात या यंत्रणेचा चकवा देत मिसाईल्स इस्रायलच्या भूमीवर आदळल्या. ड्रोनद्वारे इस्रायलवर हे हल्ले झाले. मात्र जमिनीवर पोहोचण्याआधीच ते ड्रोन हवेतच नष्ट होतायत. हवेतच ड्रोन नष्ट करणाऱ्या यंत्रणेलाच इस्रायलचं आयर्न डोम म्हटलं जातं.
रडार युनिट, टार्गेट युनिट आणि हे फायर युनिट असे ३ भाग मिळून इस्रायलचं आयर्न डोम बनलंय. हे तिन्ही उपकरणं इस्रायलची हवाई सुरक्षा करतात. समजा शत्रूनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला, त्याच्या काही सेकंदातच रडार युनिट त्या रॉकेटला ट्रॅक करतं. टार्गेट युनिट त्याचा वेगाचा अंदाज घेऊन लक्ष्य करतं आणि फायर युनिटमधून निघणारी मिसाईल हवेतच शत्रूच्या हल्ल्याला नष्ट करते. मात्र असं म्हटलं जातंय की यावेळी हमासनं या आयर्न डोम यंत्रणेतल्या त्रुटी शोधल्या. सर्वाधिक कमी अंतरानं हल्ला केला, दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त रॉकेट हल्ले झाल्यानं आयर्न डोम यंत्रणा पूर्ण ताकदीनं हल्ले रोखू शकली नाही. माहितीनुसार, हमासनं फक्त २० मिनिटात इस्रायलवर 5 हजारांहून जास्त रॉकेट हल्ले केले.
इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बीजं अनेक वर्षांपूर्वीच्या घडामोडीत आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन-वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचा जो भूभाग आहे, त्यावर १९४८ आधी ब्रिटीशांची सत्ता होती. विश्वयुद्धानंतर ज्युंसाठी इस्रायल देशाची स्थापना केली गेली. 1948 साली हिरव्या रंगाचा भूभाग आहे तो पॅलेस्टाईन झाला आणि निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल देश म्हणून घोषित झाला. मात्र इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रालयच्या निर्मितीला विरोध करत 1949 मध्ये इस्र्यालवर हल्ला केला.
एकट्या इस्रायलनं चारही देशांना युद्धात पराभूत केलं. मात्र जॉर्डन देशाकडे पॅलेस्टाईनच्या वेस्टबँक भागाचं नियंत्रण आलं. तर गाझा पट्टी म्हणवल्या जाणाऱ्या या भागात इजिप्तनं कब्जा केला. यावेळी पॅलेस्टाईन देशाचं अस्तित्व जवळपास संपुष्ठात आलं होतं. 1967 साली पुन्हा युद्धा झालं. यावेळी इस्रायलनं जॉर्डनकडून वेस्टबँक आणि इजिप्तकडून गाजा पट्टीवर कब्जा केला. जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला.
1993 मध्ये इस्रायल नियंत्रित भागाबाबत पॅलेस्टाईनशी शांती करार झाला. दोन्ही देशांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं. पण 5 वर्षानंतर करार संपुष्टात आला, आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद सुरुच आहे. पुढे गाझा पट्टीतून इस्रायलनं हजारो सैनिक मागे घेतले. त्याच भागात हमास नावाची संघटना जन्माला आली, ज्या संघटनेचं उद्धीष्ट इस्रायलचा खात्मा करणं आहे.
सोप्या भाषेत बघायचं असेल तर जसं अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती, तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात हमास संघटनेचा रोल आहे, आज गाझा पट्टीत हमासचा कब्जा आहे, आणि तिथूनच इस्रायलवर हल्ले सुरु आहेत. दुसरीकडे इस्रायलनं गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याचा दावा केलाय.