अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही 5 जूनपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आहेत. दोघेही आठ दिवसासाठी फ्लाइट टेस्ट मिशनसाठी स्पेस स्टेशनवर गेले होते. पण दोन महिने झाले तरी ते परत येऊ शकले नाहीत. दोघेही अंतराळात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर आणणं महादिव्य झालं आहे. सुनीता आणि विल्मोर बोइंग स्टारलाइनर विमानाने अंतराळातील स्पेस स्टेशनला पोहोचले होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे दोघांना अंतराळातच अडकावं लागलं आहे. त्यांच्यासोबतच स्टारलाइनरही अवकाशातच पडून आहे. त्यामुळे या स्टारलाइनरचं काय होणार? असा सवालही यावेळी केला जात आहे.
दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाचे अधिकारी कामाला लागले आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून दोघांनाही परत आणण्याचा विचार करत आहोत, असं नासाने म्हटलं आहे. पण स्टारलाइनरच्या माध्यामतून सुनीता आणि विल्मोर हे परत येऊ शकले किंवा नाही येऊ शकले तर स्टारलाइनरचं काय होणार? अंतराळात भंगार बनून स्टारलाइनर पडून राहणार का? की ते परत आणताच येणार नाही का?
अधिकाऱ्यांच्या मतानुसार, स्टारलाइनर एअरक्राफ्ट अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर येण्यास सक्षम आहे. जर अमेरिकन स्पेस एजन्सी क्रू9 मिशनच्या अंतर्गत ड्रॅगन यानने सुनीता आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला तर, कोणत्याही अंतराळवीराशिवाय बोइंगला पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि, स्टारलाइनरच्या तांत्रिकबाबी दूर झाल्या नाही तर कॅप्सुल पृथ्वीच्या वायुमंडळात जळून जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
स्टारलाइनर यानात 5 ठिकाणाहून हिलियम लीकेज आणि थ्रस्टर फेल होण्याची समस्या होती. जर ही समस्या कायम राहिली तर यान पृथ्वीवर परत येताना अंतराळातच कायमचं हरवू शकतं. त्यामुळेच नासा सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी कोणतीही रिस्क घेत नाहीये.
बोइंगचे स्टारलाइनर विमान यावेळी स्पेस स्टेशनच्या डॉकिंग पोर्टवर आहे. आणि माघारी येण्यासाठी त्याच्यावर कोणताही विश्वास करता येणार नाही. तथापीन नासाच्या क्रू9 मिशनच्या आधी स्पेस स्टेशनहून अनडॉकर करणं आवश्यक आहे. त्यामुळे नासा बोइंगला अंतराळवीराशिवाय पृथ्वीवर आणण्याचाच प्रयत्न करेल असं सांगितलं जात आहे. आधीचं मिशन फसल्यानंतर आता हे यान पृथ्वीवर येईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासा अनेक प्रकारच्या पर्यायाचा विचार करत आहे. त्यातील एक पर्याय म्हणजे एलन मस्क यांच्या स्पेसएक्स यानच्याद्वारे या दोघांना परत आणणं. यानुसार स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सुलचा वापर करून नासा सुनीता आणि विल्मोर यांना पृथ्वीपर परत आणू शकते. पण त्यासाठी अनेक महिने जातील.