स्टारलाइनर एकटाच परततोय… सुनीता विल्यम्स अंतराळात ‘या’ गोष्टी करणार; कुठे राहणार?

| Updated on: Sep 05, 2024 | 7:42 PM

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकून आता तीन महिने झाले आहेत. या दोघांनाही पुढच्या वर्षीच पृथ्वीवर आणलं जाणार आहे. आठ दिवसाच्या मिशनसाठी दोघे अंतराळात गेले होते. पण आता त्यांना आठ महिने अंतराळात थांबावं लागणार आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

स्टारलाइनर एकटाच परततोय... सुनीता विल्यम्स अंतराळात या गोष्टी करणार; कुठे राहणार?
sunita williams
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या स्टारलाइनर विमानाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले होते, तेच स्टारलाइनर विमान परतीच्या मार्गावर आहे. कोणत्याही क्रूच्या शिवायह ते परतण्यास तयार आहे. नासाने उद्या शुक्रवारी संध्याकाळी स्टारलाइनरला स्पेस स्टेशनमधून अनलॉक करण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे या स्टारलाइनर कॅप्सूलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही कॅप्सूल परतल्यानंतर सुनीता आणि विल्मोर अंतराळात काय करणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन्ही अंतराळवीर गेल्या तीन महिन्यांपासून अंतराळात अडकडले आहेत. त्यांना 13 जून रोजीच पृथ्वीवर परतायचं होतं. पण थ्रस्टरमधील बिघाड आणि हिलियम लीकेजमुळे ते होऊ शकले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव नासाने स्टारलाइनरला मानवविरहीत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनीता काय करणार?

बोइंगची ही ऑटोमेटेड कॅप्सूल न्यू मेक्सिकोच्या व्हाईट सँड मिसाईलच्या रेंजमध्ये उतरण्याचा प्रयत्न करेल. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेस स्टेशनच्या ऑर्बिटिंग लॅबमध्ये राहतील. त्यानंतर पुढच्या वर्षी फेब्रुवारीत स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत येतील. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवर आधीच असलेल्या सात अंतराळवीरांच्या प्रमाणे फुल टाइम स्टेशन क्रू मेंबर समजलं जाईल. सुनीता आणि विल्मोर स्पेस स्टेशनमध्ये प्रयोग, मेंटेनन्स, तसेच आपली हाडं आणि मसल्स मजबूत ठेवण्यासाठी एक्सरसाईज करतील.

मिशन आठवड्याचं, राहणार आठ महिने

सुनीता आणि विल्मोर अंतराळात केवळ आठ दिवसाच्या मिशनसाठी गेले होते. पण स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोघांना आता अंतराळात आठ महिने मुक्काम करावा लागणार आहे. नासाने या दोघांना तात्काळ परत आणण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते शक्य होऊ शकले नाही. शिवाय नासाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळेच नासाने आता पूर्ण तयारी करून आठ महिन्यानंतर या दोघांना परत पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

नासा उत्साहित

नासाचे कमर्शिअल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टिव्ह स्टिच यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागला आहे. स्टारलाइनर परत येत असल्याने आमची उत्सुकता वाढलीय, असं स्टिव्ह स्टिच यांनी म्हटलं आहे. गुरुवारी सुनीता आणि विल्मोर स्टारलाइनर आणि स्पेस स्टेशनच्या दरम्यानचा दरवाजा बंद करतील. त्यानंतर उद्या शुक्रवारी स्टारलाइनर पृथ्वीवर येण्याचा प्रयत्न करेल.