Explain : युद्धापेक्षा पण पुढची गोष्ट डोक्यात, म्हणून नेतन्याहू इराणवर हल्ला टाळतायत, कारण…

| Updated on: Oct 07, 2024 | 3:01 PM

Iran vs Israel : इस्रायलने अजून इराणवर पलटवार केलेला नाही. इस्रायल का पलटवार करत नाहीय? इस्रायल घाबरतोय का? इस्रायलच्या डोक्यात नेमकं काय आहे? इस्रायल कशा पद्धतीने विचार करतो? या सगळ्या लढाईत इस्रायलची युद्धाच्या मैदानातली आणि टेबलावरची राजकीय उद्दिष्टय काय? जाणून घ्या.

Explain : युद्धापेक्षा पण पुढची गोष्ट डोक्यात, म्हणून नेतन्याहू इराणवर हल्ला टाळतायत, कारण...
israel and iran war
Follow us on

मागच्या आठवड्यात इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ला केला. इराणने जवळपास 200 बॅलेस्टिक मिसाइल डागले. इस्रायलने इराणचा हा मिसाइल हल्ला हवेतच रोखला. आयरन डोम, एरो आणि अन्य एअर डिफेन्स सिस्टिमने इराणची बहुतांश मिसाइल हवेतच नष्ट केली. या हल्ल्यात इस्रायलच्या एका एअरबेसच काही प्रमाणात नुकसान झाल्याच बोललं जातय. काही मिसाइल तेल अवीवपर्यंत पोहोचली. तिथे रहाणारे भारतीय किती टेन्शनमध्ये आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या. आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे इस्रायल या हल्ल्याला प्रत्युत्तर कधी? आणि कसं देणार? आठवडा होऊन गेला, तरी इस्रायलने इराणवर पलटवार केलेला नाही. बरं, इराणने इस्रायलवर थेट मिसाइल हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यावर्षीच एप्रिल महिन्यात सीरियामधील दूतावासावरील हल्ल्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलवर असाच मिसाइल हल्ला केला होता. आताचा हल्ला हा हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाह, IRGC ऑपरेशन्सचे डेप्युटी जनरल अब्बास आणि हमास चीफ इस्माइल हानियाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी म्हणून केला होता.

इस्रायल कशा प्रकारची कारवाई करणार? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. काहीचा असा अंदाज आहे की, इस्रायल इराणच्या ऑईल डेपोला लक्ष्य करु शकतो. इराणच्या न्यूक्लियर साईटवर हल्ला होईल, असाही अंदाज आहे. आम्ही याचा बदला घेणार हे इस्रायलने आधीच जाहीर केलय. फक्त कसा? करणार काय? हाच प्रश्न आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या डोक्यात युद्धा पलीकडचा विचार असू शकतो. इस्रायलने इराणसारखाच मिसाइल हल्ला करायचा ठरवलं, तर त्यांना सहज शक्य आहे. यामध्ये इराणच खूप मोठं नुकसान होईल. इराणकडे एअर फोर्स नावाला आहे. त्याशिवाय त्यांची एअर डिफेन्स सिस्टिमही तितकी मजबूत नाही, की ती इस्रायलचा हल्ला रोखू शकेल. उलट इस्रायलपेक्षा इराणच जास्त नुकसान आहे.

कारवाई करताना इस्रायलला अमेरिकेची मदत कधी लागेल?

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना हे माहितीय. असा हल्ला केल्यानंतर मात्र, क्षेत्रीय युद्धाची सुरुवात होऊ शकते. त्याचा थेट परिणाम तेल पुरवठा आणि व्यापारावर होईल. सध्याच्या घडीला जगाला हे परवडणारं नाहीय. इस्रायल एअर स्ट्राइकमध्ये इराणच मोठं नुकसान करु शकतो. पण आज लेबनान आणि गाजा पट्टीत इस्रायल जी लढाई लढतोय, तसं इराणमध्ये घुसणं तितकं सोप नाहीय. इराणकडे जमिनीवरच्या लढाईसाठी मजबूत सैन्य बळ आहे. इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेची मदत लागेल. अमेरिका आधीच युद्धविरामाच्या मागे लागली आहे. इस्रायलच्या अशा कुठल्याही प्रस्तावाला बायडेन प्रशानसाकडून मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ष अखेरीस अमेरिकेत निवडणुका आहेत. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यास इराणविरोधात मोठी कारवाई शक्य आहे. आत्ताच ते इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले करा असं म्हणत आहेत.

युद्धात इस्रायलचा राजकीय उद्देश काय?

इस्रायल सध्या गाजा पट्टीत हमास आणि लेबनानध्ये हिज्बुल्लाह विरोधात लढाई लढतोय. इराणने इस्रायलभोवती हे जे चक्र उभारलय, ते उद्धवस्त करण्याचा नेतन्याहू यांचा प्रयत्न आहे. इस्रायलची रणनिती बघितली तर लक्षात येईल की त्यांनी आधी हमासच कंबरड मोडलं. त्यानंतर हिज्बुल्लाहच्या मागे लागले. त्यामुळे इराणविरोधात ते इतक्यात पावलं उचलतील असं वाटत नाही. हमास आणि हिज्बुल्लाह यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करुन इस्रायल धार्जिणी राजवट आणण्याचा नेतन्याहू यांचा प्रयत्न आहे. जेणेकरुन इस्रायलच्या मानगुटीवरच कायमस्वरुपी संकट निकाली निघेल.

इराण विरोधात इस्रायलचा रणनितीक उद्देश काय असेल?

इराणविरोधात थेट लढाई लढण्यापेक्षा इराणी जनतेने अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या राजवटी विरोधात उठाव करावा हा त्यांचा प्रयत्न आहे. आधीच इराणवर आर्थिक निर्बंध आहे. तिथल्या जनतेच्या मनात इराणी राजवटी विरोधात असंतोष आहे. त्याच असंतोषाला हवा देऊन अमेरिकेला अनुकूल राजवट इराणमध्ये आणायची, जेणेकरुन इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही हा नेतन्याहू यांचा प्रयत्न असेल. इराणला काहीही करुन अमेरिका-इस्रायल अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही. कारण याचा सर्वात जास्त धोका त्यांनाच आहे. इराणने मिसाइल हल्ल्याद्वारे आपली पोहोच दाखवून दिलीय. त्यामुळे इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाला लक्ष्य करणं हा त्यांचा रणनितीक उद्देश असेलच. पण राजकीय लक्ष्य त्यापेक्षा मोठं आहे.