बीजिंग: सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला (china) सध्या एका प्रश्नाने चांगलंच ग्रासलं आहे. तो म्हणजे चीनची लोकसंख्या (population) दिवसे न् दिवस कमी होत आहे. त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. चीनला या प्रश्नाने किती घेरलं हे एका महिलेच्या पोस्टवरून दिसून येत आहे. मला स्थानिक प्रशासनाकडून फोन आला. तुम्ही गर्भवती (pregnant) कधी होणार आहात? असा प्रश्न त्यांनी मला केला, असं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पोस्टवर तब्बल 10 हजार लोकांनी कमेंट केली आणि आपल्यालाही असाच फोन आल्याचं सांगितलं. या विषयाचा चांगलाच गवगवा झाल्यानंतर प्रशासनाने नंतर ही पोस्ट हटवली आहे.
एका महिलेने तिच्या सहकारी महिलेला आलेल्या फोनबद्दलची माहिती दिली आहे. प्रशासनातील एका महिला अधिकाऱ्याचा तिला फोन आला होता. नव विवाहित दाम्पत्याने एका वर्षात मुल जन्माला घालावं, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला वारंवार फोन करून विचारावं लागतं. तसे सरकारचे आदेश आहेत, असं या महिलेने फोनवर म्हटलं आहे.
दुसऱ्या महिलेनेही तिचा अनुभव व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर मला गर्भवती व्हा असं सांगणारा दोनदा फोन येऊन गेला. तुमचं लग्न झालंय तर तुम्ही मुलांना जन्म देण्याचं प्लॅनिंग का करत नाही? मुलांना जन्माला घालण्यासाठी वेळ काढा, असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याचं या महिलेने म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीची बैठक झाली. त्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशाचा बर्थ रेट वाढवण्याचं आवाहन केलं होतं. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी एक धोरण आखण्यात येणार असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं. दरम्यान, देशाची लोकसंख्या घटत असल्याचं चीनने कबूल केलं आहे.