जगभरातून इस्रायलला मोठा विरोध होतोय. ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली. इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणं हा या स्ट्राइकमागे उद्देश असल्याच इस्रायलकडून सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात निष्पाप जीव मारले गेले. म्हणून ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाने ही पोस्ट व्हायरल झालीय. जगभरातून इस्रायलच निषेध होत असताना आता इस्रायलने या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे.
इस्रायलने एक फोटो पोस्ट करुन 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न केलाय. याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून नरसंहार केला होता. गर्भवती महिला, मुलं, वुद्ध यांची निदर्यतेने हत्या केली होती. म्हणून रफाहप्रती सहानुभूती व्यक्त करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न पोस्टमधून केलाय. इस्रायलच्या रफाहवरील एअर स्ट्राइकमध्ये 45 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. AI जनरेटेड ‘ऑल आइज ऑन रफाह’ च्या पोस्टमधून इस्रायलच्या अमानवीय कृत्याकडे जगाच लक्ष वेधलं जातय.
हमासच्या हल्ल्यात किती इस्रायली ठार?
इस्रालयने पोस्ट केलेल्या फोटोमधून 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची भीषणता दाखवण्यात आलीय. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हत्याकांडात 1160 नागरिकांनी आपले प्राण गमावले. हमासने त्या शिवाय 250 जणांना बंधक बनवलं होतं. नोव्हेंबरमध्ये करार झाला, त्यानंतर काही जणांची सुटका करण्यात आली. 99 बंधक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा इस्रायलचा दावा आहे. काही बंधकांची हत्या सुद्धा करण्यात आली.