कॅनडामध्ये हिंदूंची सुरक्षा धोक्यात, व्हिडिओ जारी करुन धमकी देणारा गुरपतवंत पन्नू आहे कोण?

| Updated on: Sep 21, 2023 | 1:19 PM

india canada tention : कॅनडातील हिंदूंना धमकी देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी खलिस्तान समर्थक संघटनांना कॅनडातून मिळणाऱ्या वाढत्या राजकीय पाठिंब्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय आणि हिंदूंची सुरक्षा धोक्यात असल्याचं देखील भारताने एका निवेदनात म्हटले आहे.

कॅनडामध्ये हिंदूंची सुरक्षा धोक्यात, व्हिडिओ जारी करुन धमकी देणारा गुरपतवंत पन्नू आहे कोण?
Follow us on

India vs Canada issue : कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूची सुरक्षा धोक्यात आली आहे. येथील हिंदू फोरमने संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहून खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या धमकीला द्वेषपूर्ण गुन्हा मानण्यात यावे, अशी मागणी केली आहे. एका व्हिडिओमधून ‘सिख फॉर जस्टिस’ दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत असल्याचं दिसत आहे.  खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडात नवा वाद सुरु झाला आहे.

कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना धमकी

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, पन्नू कॅनेडियन शीखांना व्हँकुव्हरमध्ये 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वमतामध्ये मतदान करण्याचे आवाहन करत आहे. भारतात दहशतवादी घोषित झालेला गुरुपतवंत सिंग पन्नू एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणत आहेत, ‘भारत-हिंदू… कॅनडा सोडा, भारतात जा.’ तो त्याच्या व्हिडिओमध्ये दावा करत आहे की, खलिस्तान समर्थक शीख ‘नेहमीच कॅनडाशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी नेहमीच कॅनडाची बाजू घेतली आहे.

भारताच्या गुप्तचर संस्थांनी खलिस्तान समर्थक गट आणि त्यांना कॅनडातील वाढत्या राजकीय पाठिंब्यावर चिंता व्यक्त केली आहे. खलिस्तान समर्थक मंदिरे, कॅनडामध्ये राहणारे भारतीय, व्यवसाय करणारे भारतीय उद्योजक यांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. एजन्सींनी सांगितले की, येत्या काही दिवसांत खलिस्तान समर्थक आणि भारतीय यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

भारताने कॅनडातील आपल्या नागरिकांना केले सावध

भारताने बुधवारी एक पत्रक जारी करत कॅनडामध्ये राहणार्‍या आपल्या नागरिकांना आणि प्रवासाचा विचार करणार्‍यांना लोकांना तेथे वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि “राजकीयदृष्ट्या प्रेरित द्वेषपूर्ण गुन्हे” लक्षात घेऊन “अत्यंत सावधगिरी” बाळगण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात भारतीय समुदायाला लक्ष्य केले जाऊ शकते अशा धमक्यांची नोंद घेतली आहे. भारतीय नागरिकांना संवेदनशील भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना भारताचे प्रत्यूत्तर

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थक नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याचा दावा केला होता. हा दावा मूर्ख आणि प्रेरित असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, असे निराधार आरोप करुन खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी, ज्यांना कॅनडात आश्रय देण्यात आला आहे आणि ज्यांना भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे त्यांच्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय.