लाहोर: पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या सरकारवर आलेल्या संकटामुळे पाकिस्तानातील (pakistan) विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ (shahbaz sharif) अचानक चर्चेत आले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळेच इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत अविश्वास ठराव आला आहे. आज त्यावर मतदान होत आहे. इम्रान खान यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठीचं आवश्यक बहुमत नसल्याने शरीफ यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. स्टिल कंपनीचा व्यापारी ते इम्रान खान यांची झोप उडवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. इम्रान खान यांच्या खुर्चीला सुरुंग लावल्याने सध्या तरी जगभरातील मीडियाचा त्यांच्यावर फोकस आहे. विशेष म्हणजे शाहबाज शरीफ यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टीकोण आहे. त्यामुळे शरीफ पंतप्रधान झाल्यास भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यास मदतच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात रान उठवलं आहे. त्यांनीच इतर विरोधी पक्षाच्या मदतीने सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इम्रान खान यांच्या धोरणामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशात महागाई वाढली आहे. या सरकारला महागाई रोखण्यात अपयश आलं आहे. देशात बेरोजगारी वाढली आहे. त्याला लगाम घालण्यातही सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप शरीफ यांनी केला आहे. आक्रमक आणि तेज तर्रार नेता म्हणूनही शरीफ यांची ओळख असून तेच भावी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असल्याचं सांगितलं जातं.
70 वर्षीय शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे छोटे बंधू आहेत. पाकिस्तानचे बडे आणि महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मी हे करू शकतो असा सकारात्मक दृष्टीकोण ठेवणारे नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यावेळी त्यांचा हा दृष्टीकोण संपूर्ण देशाने पाहिला होता. त्यांनी लाहोरमध्ये पाकिस्तानातील पहिली आधुनिक मास ट्रान्स्पोर्ट सिस्टिम लागू केली होती. पाकिस्तानच्या सेनेसोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत. या शिवाय भारताबाबतही त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे.
पाकिस्तानातील श्रीमंत व्यावसायिक कुटुंबात शाहबाज शरीफ यांचा जन्म झाला. त्यांनी लाहोरमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते कुटुंबाचा व्यवसाय पाहू लागले. ते पाकिस्तानच्या स्टिल कंपनीचे मालक आहेत. त्यांनी पंजाब प्रांतातून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. 1997मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र, त्याच दरम्यान पाकिस्तानात लष्करी राजवट आली. त्यामुळे 2000मध्ये ते सौदी अरेबियात पळून गेले होते. 2007मध्ये ते पुन्हा देशात परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पंजाबमधून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली.
त्यानंतर 2017मध्ये त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. त्यांचे बंधू नवाज शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर शाहबाज हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) पार्टीचे अध्यक्ष बनले. दोन्ही भावांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र, शाहबाज यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नव्हते.
संबंधित बातम्या: