ढाका : जानेवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशमध्ये भारतविरोधी मोहीम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीत शेख हसीना यांच्या नेतृत्वात अवामी लीग सलग चौथ्यांदा सत्तेत आलाय. बांगलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने निवडणुकीवर भारताने प्रभाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बांगलादेशमध्ये सोशल मीडियावर ‘इंडिया आऊट’ मोहीम सुरु झाली आहे. ही मोहीम मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये सुरु केलेल्या मोहिमेप्रमाणेच आहे.
द डिप्लोमॅटनुसार, इंडिया आउट ही मोहिम अवामी लीगच्या भूमिकेविरोधातील असंतोष दर्शवितो. मोहिमेच्या समर्थकांचे म्हणणे आहे की अवामी लीगला भारताचा पाठिंबा आहे. बांगलादेशच्या देशांतर्गत व्यवहारात भारताच्या सततच्या हस्तक्षेप होत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत.
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी अवामी लीगवर सातत्याने हेराफेरीचे आरोप होत आहेत. अवामी लीगला भारतातून पाठिंबा मिळत असल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशातील न्यायव्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना कमकुवत केले जात असल्याचं बोललं जात आहे. या संस्थांवर भारताचा बराच प्रभाव असल्याचे मानले जाते.
बांग्लादेशचे माजी परराष्ट्र सचिव तौहीद हुसेन यांनी त्यांच्या “1971-2021: बांगलादेश-भारत शोमपोरकर पोंचश बोचोर” या पुस्तकात असे म्हटले आहे की, “बांगलादेशातील प्रमुख पदांवर नियुक्तीसाठी भारताची संमती ही पूर्वअट आहे.” बांगलादेशमध्ये असाही एक समज आहे की भारतीय दूतावास नागरी आणि लष्करी नोकरशाहीतील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकतो. भारताबद्दलच्या या समज आता सोशल मीडियावरील “इंडिया आऊट” मोहिमेत भरल्या आहेत. ही मोहीम किती दिवस चालणार, असे अनेक प्रश्न आहेत. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यात गुंतागुंतीचे नाते आहे पण सध्या या मोहिमेचा प्रभाव बांगलादेशात दिसून येत आहे.
मालदीवमध्ये देखील भारत विरोधी भूमिका घेत मोहम्मद मुईज्जू सत्तेत आले आहेत. त्यांनी मालदीवच्या धरतीवर कोणत्याही परकीय देशाच्या लष्कराच्या उपस्थितीवरुन मालदीवमध्ये इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यांच्या याच भूमिकेमुळे ते सत्तेत आले असल्याचं विश्लेषकांनी म्हटले आहे. आता बांगलादेशमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे.