रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर

| Updated on: Jul 30, 2024 | 12:17 AM

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा भारताचा प्रयत्न आहे का? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीच याचे उत्तर दिले आहे. आम्ही आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार का याबाबत ही त्यांनी संकेत दिले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर
Follow us on

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत प्रयत्न करेल का यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संकेत दिले आहेत. एस जयशंकर म्हणाले की, भविष्यात भारत हा युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांसोबत संवाद साधेल. ज्यामुळे दोन्ही बाजूंशी संपर्क साधला जाईल आणि संघर्ष सोडवण्यात मदत होईल. जयशंकर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी त्यांनी नुकताच रशियाला भेट दिली होती. जिथे त्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भेट झाली होती.

एस जयशंकर म्हणाले की, संघर्षावर तोडगा युद्धभूमीतून येणार नाही ही भारताची भूमिका आहे. परिस्थिती आहे तशीच सोडून देणे आणि इतर घटना घडण्याची वाट पाहणे हा चुकीचा निर्णय आहे. संकट संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील. जपानच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर म्हणाले की, “आम्ही तिथे अधिक सक्रिय व्हायला हवे, असा आमचा विश्वास आहे.”

मोदी युक्रेनला जाणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनला भेट देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर एस जयशंकर म्हणाले, मी आशा करू शकतो की आमचे दोन्ही देशांसोबत संपर्क असेल. परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र ते पूर्णपणे स्पष्ट केले नाही.  ते म्हणाले की, कोणत्याही सरकारप्रमाणे आम्हीही योग्य वेळी योग्य आमची भूमिका स्पष्ट करु. आम्हाला विश्वास आहे की युक्रेन-रशिया संघर्ष संपवण्यासाठी आणखी काही करणे आवश्यक आहे.

एस जयशंकर म्हणाले की, आमचा विश्वास आहे की युक्रेनचे संकट थांबवण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. जगाच्या इतर भागांत घडणाऱ्या घटनांप्रमाणेच यावरही उपाय शोधण्याचा आपण त्वरित प्रयत्न केला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. कारण अनेक देश दोन्ही बाजूंशी बोलत नाहीत. दोन्ही देश युद्धभूमी सोडून वाटाघाटीच्या टेबलावर यावेत, यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू.