इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनेई यांनी बदला घेणार असल्याच जाहीर केलं आहे. इराणचे बॅलेस्टिक मिसाइल प्लॅटफॉर्म हल्ल्यासाठी स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर तैनात करण्यात आले आहेत. पुढच्या 72 तासात इस्रायलवर कधीही हल्ला होईल अशी स्थिती आहे. इस्रायलने आधीच स्पष्ट केलय इराणने अशी चूक करु नये. 25 ऑक्टोंबरला इस्रालयने इराणमध्ये घुसून जो एअर स्ट्राइक केला, त्यामुळे इराण बदल्याच्या आगीमध्ये होरपळतोय. इराणने आधी म्हटलं होतं की, इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झालं नाही. पण बदला घेण्याची धमकी का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. इराणने 1 ऑक्टोंबरला इस्रायलवर मिसाइल हल्ला केला होता. त्यानंतर 25 दिवसांनी इस्रायलने इराणमध्ये घुसून त्यांच्या लष्करी क्षमतेच खच्चीकरण केलं. बॅलेस्टिक मिसाइल बनवणारे कारखाने उद्धवस्त केले.
पुन्हा इराणने इस्रायलवर हल्ल्याच धाडस केलं, तर इस्रायलला इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पावर हल्ला करण्यासाठी एक कारण मिळेल. मागच्यावेळी अमेरिकेच्या दबावामुळे इस्रायलने असं पाऊल उचललं नव्हतं. इराण इस्रायलवर हल्ल्याचा प्लान बनवत आहे. त्याचवेळी इस्रायलने सुद्धा जाहीर केलय. इराणची अणवस्त्र संपन्न राष्ट्र होण्याची महत्त्वकांक्षा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. रिपोर्ट्सनुसार इराण अणूबॉम्ब बनवण्याच्या खूप जवळ पोहोचला आहे. इराणने अणू बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
इस्रायलकडे कुठले दोन पर्याय?
इराणच्या हाती खरच अणूबॉम्ब लागला, तर त्यामुळे सर्वात जास्त धोका इस्रायललाच आहे. म्हणून इस्रायलने वारंवार त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमात अडथळे आणले आहेत. इराणला अण्वस्त्र संपन्न देश बनण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय थोडा कठीण आहे.
आता इस्रायलसाठी असा हल्ला करणं कठीण का?
इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पावर थेट मिसाइल हल्ला हा पहिला पर्याय आहे. पण हे कठीण काम आहे. कारण इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम जमिनीच्या पोटात खूप खोलवर चालू आहे. इस्रायलकडे असं शस्त्र नाहीय, जे डोंगराला चिरुन 200 मीटर खोलवर हल्ला करु शकेल. तसच यासाठी इस्रायलला अमेरिकेची परवानगी मिळणं कठीण आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पावर हल्ला केल्यास रशिया थेट युद्धात उतरु शकतो. दुसरा पर्याय आहे, सायबर हल्ला. ते याआधी सुद्धा इस्रायलने केलय. वर्ष 2005 मध्ये इस्रायलने स्टक्सनेट नावाचा एका व्हायरस बनवला. इराणच्या अणवस्त्र प्रकल्पातील कॉम्प्युटर्समध्ये हा स्टक्सनेट व्हायरस सोडण्यात आला. यात इराणचे सर्व यूरेनियम सेंट्रीफ्यूज नष्ट झाले होते.