‘खुर्ची संभाळताच पहिलं भारतीय सैन्याला बाहेर काढणार’, कुठल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने असं म्हटलं?

| Updated on: Oct 18, 2023 | 12:24 PM

सत्तेच्या गादीवर येणार, हे स्पष्ट होताच या देशाच्या नव्या राष्ट्रप्रमुखाने भारताविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. हा राष्ट्रप्रमुख चीन समर्थक मानला जातो. त्यांच्यावर चीनचा मोठा प्रभाव आहे.

खुर्ची संभाळताच पहिलं भारतीय सैन्याला बाहेर काढणार,  कुठल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने असं म्हटलं?
India neighbour country
Image Credit source: AFP
Follow us on

नवी दिल्ली : सत्तेवर येताच एका छोट्याशा देशाने भारताविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. हा देश भारताचा शेजारी आहे. भारतावर या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सत्तेच्या गादीवर येणार, हे स्पष्ट होताच या देशाच्या नव्या राष्ट्रप्रमुखाने भारताविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या देशाच्या राष्ट्रप्रमुखाने भारत विरोधी मुद्यावरच निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्तेवर येताच आश्वासनांची पूर्तता करण्यास प्राधान्य दिलं आहे. मोहम्मद मुइजू या मालदीवच्या नव्या सत्ताधीशाने ही भूमिका जाहीर केलीय. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संभाळल्यानंतर पहिल्या आठवड्यातच भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवणार असं मोहम्मद मुइजू यांनी म्हटलं आहे. पुढच्या महिन्यात मोहम्मद मुइजू अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार संभाळतील. डिप्लोमॅटिक मार्गानेच आपण भारतीय सैन्य हटवू असं मुइजू यांनी म्हटलं आहे.

मोहम्मद मुइजू हे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जातात. मोहम्मद मुइजू यांच्यावर चीनचा मोठा प्रभाव आहे. संपूर्ण निवडणूक प्रचारात त्यांनी भारविरोधी अजेंडा राबवला. त्यामुळे ते सत्तेवर येताच भारतविरोधी भूमिका घेणार असा अंदाज होता. तशी सुरुवात त्यांनी केली आहे. राष्ट्राध्यक्षपद संभाळल्यानंतर मी पहिल्याच दिवशी भारताला, त्यांचं सैन्य मायदेशात नेण्याची विनंती करणार आहे, असं ते म्हणाले. एका आंतरराष्ट्रीय वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखीतत ते हे म्हणाले. मोहम्मद मुइजू यांनी मालदीवमधल्या निवडणुकीत इब्राहीम सोलीह यांचा पराभव केला. इब्राहीम सोलीह भारत समर्थक मानले जातात.

अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून

“अनेक शतकांपासून आम्ही शांतीप्रिय राष्ट्र राहिलो आहोत. आमच्या भूमीवर परदेशी सैन्य नव्हतं. आमच मोठ लष्कर नाहीय. परदेशी सैन्य आमच्या भूमीवर असेल, तर आम्हाला सुरक्षित वाटत नाही” असं मोहम्मद मुइजू म्हणाले. चीनच्या बाजूला तुमच परराष्ट्र धोरण झुकणार का? या प्रश्नानवर ते म्हणाले की, “कोणालाही सुखावण्यासाठी आम्ही कोणाच्या बाजूने जाणार नाही. आम्हाला सर्वप्रथम आमच हित पहायच आहे. जे कोणी आमचा आदर करेल, त्यांच्याशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेऊ” मालदीवची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय मालदीवला जात असतात.