पाकिस्तानात घेतलेली निवडणुका रद्द होणार का? सुप्रीम कोर्ट घेणार निर्णय

| Updated on: Feb 16, 2024 | 8:08 PM

पाकिस्तानात पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप अनेक पक्षांनी केला आहे. पाकिस्तानात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेचा पेच कायम आहे. दोन्ही बाजुने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानात घेतलेली निवडणुका रद्द होणार का? सुप्रीम कोर्ट घेणार निर्णय
Follow us on

Pakistan election 2024 : 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात झालेली सार्वत्रिक निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. पाकिस्तानी नागरिक अली खान यांनी याचिकेत ३० दिवसांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. झालेल्या निवडणुकीत निष्पक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी न्यायपालिकेच्या देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, याचिकेत पाकिस्तान निवडणूक आयोग (ECP) आणि फेडरल सरकारला या प्रकरणात प्रतिवादी म्हणून नाव देण्यात आले आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत नवीन सरकार स्थापनेला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थनात अपक्ष उमेदवारांनी 92 जागा, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) ने 75 जागा तर पाकिस्तान पीपल्स पार्टीने 54 जागा जिंकल्या.

निवडणुकीत हेराफेरीचा आरोप

विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. असे द एक्सप्रेस ट्रिब्यूनचे वृत्त आहे. सिंध उच्च न्यायालयाने (SHC) निर्देश दिले की निवडणूक पर्यवेक्षकांनी सर्व पक्षांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात आणि 22 फेब्रुवारीपूर्वी कायद्यानुसार निर्णय घ्यावा. पुढे, निवडणूक आयोगाने फॉर्म 45 आणि 47 मधील अर्जदारांच्या नोंदींची छाननी करावी. त्यात काही अनियमितता आढळल्यास ती काढून टाकावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर बलुचिस्तान, सिंध आणि देशाच्या इतर भागांमध्ये 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कथित हेराफेरीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहेत. नॅशनल पार्टी, पीपीपी, जेयूआय, बीएपी, बीएनपी-मेंगल, पीकेएमएपी आणि पीकेएनएपी या राजकीय पक्षांनी प्रमुख मार्गांवर आणि जिल्हा रिटर्निंग कार्यालयांवर निदर्शने केली, बलुचिस्तानमध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी केली आणि घोषित निकालांना आव्हान देण्यात आले.

कुणाकडेच नाही बहुमत

पाकिस्तानात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाचे सरकार येईल हे अजून निश्चित झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी इम्रान खान यांच्या पक्षाने देखील दावा केला असून पंतप्रधानपदाचा उमेदवार ही घोषित केला आहे. दुसरीकडे नवाज शरीफ यांच्या पक्षाने देखील सत्तास्थापनेचा दावा केला आहे.