जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीने आज जगाचा निरोप घेतला. ज्याने महायुद्ध पाहिले, कोरोना महामारीचा सामना केला, इतिहासाचा चालताबोलता साक्षीदार असलेला हा माणूस काळाच्या पडद्याडा गेला आहे. जुआन विसेंट पेरेज मोरा असं या व्यक्तीचं नाव. वय वर्ष 114. जुआन हे व्हेनेज्यूएलाचे रहिवाशी होते. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फेब्रुवारी 2022मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली होती. त्यावेळी त्यांचं वय होतं 112 वर्ष 253 दिवस.
व्हेनेज्यूएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी ट्विटरवरून जुआन यांच्या मृत्यूची माहिती दिली. जुआन यांचा जन्म 27 मे 1909 रोजी झाला होता. त्यांना 11 मुले, 41 नातवंडं, पणतू, 18 पतरुंडं आणि 12 ग्रेट- ग्रेट ग्रँड चिल्ड्रन आहेत. गिनिज बुकातील माहितीनुसार, जुआन व्यवसायाने शेतकरी होते. कठोर मेहनत, वेळेवर झोप घेणं आणि रोज एक ग्लास ऊसाने बनलेली दारू पिणे हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं गिनिज बुकात म्हटलं आहे.
जुआन यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडील आणि भावांसोबत शेतात काम करायला सुरुवात केली. ते ऊस आणि कॉफीच्या मळ्यात त्यांची मदत करायचे. त्यानंतर ते शेरीफ ( स्थानिक पोलीस अधिकारी) बनले आणि आपल्या परिसरातील तंटे बखडे सोडवण्याचं काम सुरू केलं. यावेळी त्यांनी शेतीचं कामही सुरू ठेवलं होतं.
1938मध्ये जुआन यांनी एडिओफिना गार्सिया नावाच्या महिलेशी विवाह केला. त्यांच्या पत्नीचं निधन 1997मध्ये झालं. स्पेनच्या सॅटर्निनो डे ला फुएंते गार्सिया यांचं 18 जानेवारी 2022 रोजी निधन झालं. गार्सिया यांचं वय त्यावेळी 112 वर्ष आणि 341 दिवस होतं. त्यांच्या निधनानंतर जुआन यांना 2022मध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना कोणताही आजार नव्हता. ते कोणतेही औषधं घेत नव्हते. मात्र, वयामुळे त्यांना ऐकायला थोडं कमी येत होतं. जुआन यांना बालपणीच्या अनेक गोष्टी आठवत होत्या. त्यांना केक खाणं, सूप पिणं आणि एवोकॅडो खाणं आवडायचं.
यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झालं होतं. दक्षिण आफ्रिकेत राहणारी जोहाना माजिबुको 128 वर्षाच्या होत्या. त्यांचा जन्म 1894मध्ये झाला होता. जोहाना यांना 7 मुले होती. 50 हून अधिक नातवंडे होती. पतरुंडं होती. जोहाना अशिक्षित होत्या. त्या शेती करायच्या. त्यांनी 1914चे पहिले महायुद्ध, 1939चं दुसरं महायुद्ध आणि स्पॅनिश फ्ल्यूपासून ते कोरोना महामारीचा सामना केला होता.