पावसाळा सुरु झाला की, वातावारणात गारवा निर्माण होता आणि सगळीकडे हिरवळ तयार होते. पावसाच्या आगमनाने निसर्गात अनेक बदल होतात. ज्याचा या जीवसृष्टीवर मोठा परिणाम होत असतो. अनेकांना हा ऋतू नक्कीच आवडत असेल. पावसाळा सुरु झाला की, सगळेच जण याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. पण या दिवसात मच्छरांची पैदास ही भरपूर होते. मच्छर चावायला लागले की झोप उडाली शिवाय राहत नाही. पण मच्छरांमुळे वेगवेगळे आजार देखील होतात. यामुळे संसर्ग पसरतो. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया सारख्या समस्या निर्माण होतात. ज्या अतिशय गंभीर झाले की लोकांचा मृत्यूही होतो. त्यामुळेच अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी डासांपासून दूर राहणे गरजेचे आहे. पण या मच्छरांवर कायमचा इलाज नाही का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांना कायमचं संपवता येऊ शकतं का?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, मच्छर हे जगातील सर्वात प्राणघातक जीवांपैकी एक आहेत. ज्यामुळे दरवर्षी जगभरात हजारो लोकांचा मृत्यू होतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगात डासांच्या ३,००० हून अधिक प्रजाती ओळखल्या जातात. त्यामुळेच हवामान बदलले की या समस्या अधिक गंभीर होऊ शकते. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, जर जगातील सर्व डासांचा नायनाट केला तर काय होऊ शकते? याबाबत तज्ञांचे मत काय आहे जाणून घेऊताय.
जर तुम्ही सर्व डास मारले तर काय होईल हे जाणून घ्यायचे असेल तर यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कीटकशास्त्रज्ञ फिल लोनिबस सांगतात की, जगातील सर्व डासांना संपवले तर त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गावर होऊ शकतात. ज्याचा परिणाम माणसावर देखील होऊ शकतो.
लोनिबस यांच्या माहितीनुसार, डास हे वनस्पतींचा रस पिऊन जिवंत राहतात. त्यांच्यामुळेच वनस्पतींचे परागकण निसर्गात पसरतात. त्यामुळे वनस्पतींमध्ये असलेली फुले ही फळांमध्ये विकसित होतात. त्यामुळे डास हे निसर्गासाठी खूप महत्वाचे आहेत. नैसर्गिक अन्नचक्रात डासांना महत्त्वाचे स्थान आहे. अनेक पक्षी आणि वटवाघुळ डास खातात. मासे आणि बेडूक यांचे खाद्य देखील डासच आहेत. त्यामुळे जर डासच नष्ट केले तर निसर्गाच्या अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होऊ शकतात.
अनेक शास्त्रज्ञांची मते भिन्न भिन्न आहेत. काही शास्त्रज्ञ सांगतात की, जर डासांना समूळ नष्ट केले तर इतर जीव या नैसर्गिक अन्नसाखळीत त्याची जागा घेतील. जेव्हा पृथ्वी विकसित झाली तेव्हापासून आतापर्यंत अनेक प्रजाती नामशेष झाल्या होत्या. त्यामुळे या प्रजाती नष्ट झाल्यामुळे जग उद्ध्वस्त झाले नाही, पण त्यांची जागा इतर नवीन प्रजातींनी घेतली.
डासांचा नायनाट झाल्यानंतर त्याची जागा दुसरे जीव घेतील पण त्यासोबतच इतर आजारांचा धोका देखील वाढेल. कारण ते डासांइतकेच किंवा त्याच्यापेक्षा अधिक घातक असू शकतात. या नव्या जीवाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यानंतर हे नवीन जीव झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक नवीन रोग आणि संक्रमण होऊ शकतात.