विहीर गोल का असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे त्रिकोण, चौकोनी किंवा षट्भुज आकाराचे देखील असू शकतात, होय ना? पण याचं कारण मनोरंजक आणि तितकंच वैज्ञानिक आहे. विहिरीच्या गोल आकाराचे कारण म्हणजे विज्ञान. विहीर बराच काळ टिकून राहावी म्हणून हे केले जाते. विहीर फार जुन्या काळापासून बांधण्यात येतीये तेव्हापासून या गोष्टीची काळजी घेतली जात आहे. विहिरीचा गोल आकार आणि त्याच्या बांधकामाच्या वेळी घ्यावयाची उर्वरित खबरदारी याबद्दल आपण जाणून घेऊया.
हे जाणून घ्या की जेव्हा जेव्हा एखादा द्रव पदार्थ साठवला जातो तेव्हा तो जसं बाहेरचं आवरण असेल तसाच आकार घेतो. जेव्हा एखाद्या भांड्यात द्रव ठेवले जाते तेव्हा ते द्रव त्या भिंतींवर दबाव देते. ही विहीर चौकोनी आकारात बांधली तर त्यातील पाण्यामुळे विहिरीच्या भिंतीच्या कोपऱ्यांवर अधिक दाब पडतो. असं झाल्यास विहिरीचे वय कमी होते. यामुळे विहीर तुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच विहीर गोल आकारात बांधण्यात येते. विहीर जर गोल असेल तर त्यामुळे विहिरीच्या भिंतीच्या प्रत्येक बाजूस आतील पाण्याचा दाब सारखाच असतो.
तुमच्या घरात असणारी बहुतेक भांडीही गोल असतात. ग्लास, प्लेट, वाटी, बादली किंवा प्लेट पाहिली तर सगळे गोल असतात. दाबाचा नियम लक्षात घेऊन पात्राचे पृष्ठभाग गोल केले जातात. गोल भांड्यांना दीर्घायुष्य असते.
चौकोनी आकाराच्या विहिरी तुम्ही पाहिल्या असतील, पण त्या फारशा भक्कम नसतात. त्यांचे आयुष्य तुलनेने कमी असते. गोल विहिरी जास्त काळ टिकतात. गोल विहिरीची माती फार काळ सडत नाही. गोल विहिरीच्या आतील पृष्ठभागावरील दाब सर्व बाजूंनी सारखाच असतो.