Indian Railway : देशभरात दररोज लाखो-कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वे या सर्व प्रवाशांना इच्छित ठिकाणी पोहोचवण्याच कार्य करते. सध्या भारतीय रेल्वे 11 हजार ट्रेन्सच संचालन करतेय. भारतीय रेल्वे जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्क्सपैकी एक आहे. रेल्वे नेटवर्क्समध्ये भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय रेल्वेकडे 9 हजार मालगाडया, 13 हजार रेल्वे गाडया आणि 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत. सध्या भारतीय रेल्वेचा, प्रवासी सुविधा वाढवण्यावर आणि रेल्वेच्या आधुनिकी करणावर जोर आहे. भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन्सना नावं कशी दिली जातात? या बद्दल तुम्हाला माहित आहे का?
ट्रेन्सना नाव देण्यासाठी रेल्वेचा फॉर्म्युला
भारतीय रेल्वेमध्ये प्रत्येक ट्रेनच एक नाव आहे. त्यासाठी रेल्वेचा एका फॉर्म्युला आहे. ट्रेन जिथून सुरु होते आणि प्रवास जिथे संपतो, त्या ठिकाणाची नावं दिली जातात. उदहारणार्थ चेन्नई-जयपूर एक्सप्रेस, कोटा-पटना एक्सप्रेस. त्याशिवाय धार्मिक स्थळ किंवा लोकेशन्सच नाव दिलं जातं. जसं की, काशी विश्वनाथ एक्सप्रेस, वैशाली सुपरफास्ट एक्सप्रेस, बिहारच्या वैशाली जिल्ह्याचा संबंध भगवान गौतम बुद्धांशी आहे. वाराणसी नगरी भगवान शंकरासाठी ओळखली जाते. त्यामुळे संबंधित धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांची नावं ट्रेन्सना दिली जातात.
शताब्दी, दुरंतो आणि राजधानीबद्दल जाणून घ्या
शताब्दी आणि राजधानी या सुपरफास्ट ट्रेन्सनी तुम्ही प्रवास जरुर केला असेल. राजधानी एक्सप्रेस दोन राज्यांच्या राजधान्यांमध्ये धावते. भारताच्या अव्वल दर्जाच्या ट्रेन्समध्ये राजधानीचा समावेश होतो. या ट्रेन्सचा वेग आणि सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. प्रतितास 140 किलोमीटरच्या वेगाने ही ट्रेन धावते.
शताब्दी एक्सप्रेस हे नाव कसं ठरलं?
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 100 व्या जन्मदिनी 1989 साली शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली. 100 वर्षाच्या कालावधीला शताब्दी म्हटलं जातं. म्हणूनच या ट्रेनच नाव शताब्दी ठेवण्यात आलं. ही ट्रेन प्रतितास 160 किलोमीटरच्या वेगाने धावते. त्याशिवाय दुरंतो एक्सप्रेस काही स्टेशन्सवर थांबते. दुरंतोचा अर्थ होतो विनाअडथळा. त्यामुळेच या ट्रेनला दुरंतो म्हटलं जातं. या ट्रेनचा वेग प्रतितास 140 किलोमीटर आहे.