मुंबई : आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्या चेक सर्रास वापरला जातो. चेकमुळे मोठी रोख रक्कम स्वतःकडे न बाळगताही कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात. यासाठी खातेधारकाला आपल्या चेकवर पेमेंट करण्याचे आदेश देण्यासाठी आपली स्वाक्षरी करावी लागते. चेकवर पैसे ज्याला द्यायचे आहे त्याचे नाव, किती पैसे द्यायचे याचा तपशील आणि बँकेचे डिटेल्स अशी बरीच माहिती असते. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेकवर डाव्या बाजूला सर्वात वर मारलेल्या दोन तिरक्या रेषा. या दोन रेषांचा तुम्हाला अर्थ माहिती आहे? चला तर मग जाणून घेऊया याचा अर्थ आणि महत्त्व (Know the meaning and importance of two lines on cheque).
चेकवर मारलेल्या दोन रेषांना आर्थिक व्यवहारात खूप महत्त्व आहे. या दोन रेषा मारल्याने या चेकच्या व्यवहाराचं स्वरुप पूर्णपणे बदलून जातं. म्हणूनच चेकवर या दोन रेषा मारताना खूप विचार करुन मारल्या पाहिजेत. नाहीतर ज्याला चेक दिला आहे त्याला पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. या दोन रेषा ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात.
चेकवर या दोन रेषा मारल्यास ज्या व्यक्तीच्या नावावर हा चेक दिलाय त्याच्या बँक खात्यावरच पैसे जमा होतात. असा चेक बँकेत देऊन तुम्हाला हातात रोख रक्कम मिळणार नाही. यासाठी तुम्हाला तो चेक आधी तुमच्या खात्यावर डिपॉझिट करावा लागेल आणि नंतर खात्यातून पैसे काढावे लागतील. म्हणजेच तुम्हाला मोठी रक्कम असेल आणि संबंधित पैसे त्या व्यक्तीच्या थेट खात्यावर जमा व्हावेत असंच वाटत असेल तर तुम्ही आवर्जून या दोन रेषा मारु शकता.
दुसरीकडे एखाद्या व्यक्तीकडे बँक खाते नसेल अथवा बँक खाते असूनही त्याला तातडीने पैशांची गरज असेल तर या रेषा मारणे टाळायला हवे. कारण जर तुम्ही दोन रेषा मारल्या तर तो चेक संबंधित व्यक्तीला आपल्या खात्यात जमा झाल्याशिवाय पैसे मिळणार नाही. यासाठी 3-4 दिवसांचा वेळ जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तातडीने पैशांची गरज असेल आणि तुम्ही तातडीची गरज म्हणूनच पैसे दिले असतील, तर या दोन रेषांमुळे अडचण येऊ शकते.