नवी दिल्ली: सरत्या वर्षाला निरोप देत आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जातो अन् 1 जानेवारी रोजी नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. संपूर्ण जगाचं नव वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होतं. त्यामुळे जगभरात दरवर्षी त्यानिमित्ताने जल्लोष केला जातो. पण पूर्वी जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होत नव्हतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी जानेवारी हा महिनाच कॅलेंडरमध्ये नव्हता. तसेच वर्षाचे दिवसही 365 नव्हते. आणि वर्षाला बारा महिनेही नव्हते. या आणि अशा रोचक गोष्टींवर टाकलेला हा प्रकाश.
पूर्वी जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरुवात होत नव्हती. दुसऱ्याच महिन्यापासून नव्या वर्षाची सुरुवात होत होती. तसेच नव्या वर्षाची तारीख ही 1 तारीख नसायची. ती तारीख वेगळीच होती. अनेक वर्षानंतर कॅलेंडरमध्ये बदल झाला. त्यानंतर 1 जानेवारीपासून नव वर्ष साजरं करण्यात येऊ लागलं.
नवीन वर्ष साजरं करण्याची सुरुवात 15 ऑक्टोबर 1585 पासून सुरू झाली. त्याआधी नवीन वर्षाची सुरुवात मार्चपासून व्हायची. एका माहितीनुसार, रोमचा राजा नूमा पोंपिलसने नंतर रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक ते बदल केले. त्यानंतर कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्याची भर पडली आणि जानेवारीपासून नवीन वर्ष साजरं करण्याचा पायंडा पडला.
पूर्वीच्या कॅलेंडरमध्ये फक्त दहाच महिने होते. मार्चपासून डिसेंबरपर्यंत हे महिने होते. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचा समावेश नव्हता. किंबहूना हे दोन महिनेच अस्तित्वात नव्हते. त्याकाळी 310 दिवसाचं वर्ष असायचं. मात्र, जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरुवात रोमन सम्राट जूलियस सीजरने केली.
काही खगोल शास्त्रज्ञांची जूलियस सीजर यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या खगोल शास्त्रज्ञांनी त्यांना सूर्यमालेचं रहस्य सांगितलं. पृथ्वीला सूर्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस आणि सहा तास लागतात, असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं.
त्यामुळे दहा महिन्यांऐवजी 12 महिने करणअयात आले. तसेच वर्षाचे दिवस वाढवून 365 करण्यात आले. उरलेल्या 6 तासांना चार वर्षाला जोडून हे दिवस 366 करण्यात आले. त्याला लीप इयर म्हटलं जातं.
1582 मध्ये पोप ग्रेगरी यांना ज्यूलियस कॅलेंडरमधील लीप इयरमध्ये गडबड असल्याची माहिती मिळाली. तेव्हाचे धर्म गुरु सेंट बीड यांनी सांगितलं की, एक वर्ष 365 दिवस 6 तासे नाही तर 365 दिवस 5 तास आणि 46 सेंकदाचा आहे.
हे लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा कॅलेंडरमध्ये बदल केला गेला. रोमन कॅलेंडरमध्ये हा बदल करून नवीन कॅलेंडर तयार केलं गेलं आणि 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.