मुंबई : ‘ तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’ असे म्हणत त्याच्या पाठलागावर ‘ती’ निघाली. तो जिथे जिथे जाईल त्याच्या मागे ती सतत होती. तो कुठे जातो? काय करतो? त्याचा प्रत्येक ठावठिकाणा तिला माहित होता. तिच्यापासून पिच्छा कसा सोडवायचा या विवंचनेत असणारा तो त्या दिवसाची आतुरतेने वाट पहायचा. कारण, त्याच्या मागे, पुढे करणारी त्याची सावली त्या दोन दिवसात अदृश्य व्हायची. ती त्या दोन दिवसात कशी आणि कुठे निघून जायची हे त्याला कळतच नसे. ते दोन दिवस त्यालाही काही तरी चुकल्यासारखं वाटायचं. मग, त्याने त्या दिवशी ती कुठे जाते याचे निरीक्षण करायला सुरवात केली. मग, त्यातून जे कारण पुढे आलं ते आश्चर्यकारक होतं.
असं म्हणतात की आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही. हे शंभर नंबरी टक्के सत्य. दिवसाउजेडी मोकळ्या जागेत उभे असताना, चालताना आपली सावली आपली सोबत देत असते. सुरवातीला कमी उंची असलेली सावली सूर्योदयावेळी जास्त उंचीही होते. सावलीचा हा छुपा खेळ चालू असतो.
पण, वर्षातले दोन दिवस सावली तुमची साथ सोडते. या दोन दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ किंवा ‘शून्य सावली योग’ म्हणतात. या दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एकसमान होते. हा योग केवळ उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त या प्रदेशमध्ये राहणाऱ्या लोकांच्याच नशिबी आहे.
भरदुपारी सूर्य आकाशात बरोबर डोक्याची सावली नेमकी आपल्या पायाशी येते. त्यामुळे सावली दिसत नाही. वर्षातून सूर्य असा दोनदा डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवसाला ‘शून्य सावलीचा दिवस’ म्हणतात. मे महिन्यात आणि जुलै महिन्यात असे हे दोन दिवस येतात. पण, जुलै हा महिना पावसाचा असल्यामुळे ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येत नाही.
शून्य सावली पहायची असेल तर आधी तिचे निरीक्षण करावे लागते. उन्हात एक जाड काठी उभी करून ठेवावी. त्यावेळी सावली पडलेली दिसेल. पण, जसा जसा सूर्य आकाशात डोक्यावर येतो तशी सावली कमी होत जाते. काठीच्या मुळाशी सावली येते त्यावेळी ती अदृश्य होते. पण, नंतर पुन्हा ती सावली लांब होते.
११ मे – रत्नागिरी
१२ मे – सातारा, सोलापूर
१३ मे – उस्मानाबाद
१४ मे – रायगड, पुणे, लातूर
१५ मे – अंबेजोगाई, केज
१६ मे – मुंबई, नगर, परभणी, नांदेड
१७ मे – ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पैठण
१९ मे – संभाजीनगर, जालना, हिंगोली, चंद्रपूर
२० मे – नाशिक, वाशीम, गडचिरोली
२१ मे – बुलढाणा, यवतमाळ
२२ मे – वर्धा
२३ मे – धुळे, अकोला, अमरावती
२४ मे – भुसावळ, जळगाव, नागपूर
२५ मे – नंदुरबार