7 ऑगस्ट हा दिवस देशात राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारनं 2015 मध्ये हा दिवस सुरू केला. आज भारतानं वस्त्रोद्योगात (Indian Textile Industry) प्रचंड प्रगती केली आहे. पण या उद्योगाचा भारतातला इतिहास फार रंजक आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. (The history of handloom industry in the country on the occasion of ‘National Handloom Day’)
भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारतातले भौगोलिक प्रदेश, प्रांत, संस्कृती जशा वेगवेगळ्या आहेत तसंच भारताच्या मातीत अनेक प्राचीन कला दडलेल्या आहेत. त्यापैकीच एक कला म्हणजे हातमाग (Handloom). जेव्हापासून भारतात देश ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हापासून या मातीतले कारागिर आपल्या कौशल्यानं हातमागावर विविध भरजरी वस्त्र विणत होती. ज्यांना परदेशात मोठी मागणी होती.
मध्ययुगीन इतिहासाच्या उत्तरार्धाच्या काळात आणि आधुनिक इतिहासाच्या कालखंडात भारताचे जगभरातल्या अनेक देशांशी व्यापारी संबंध होते. याकाळात मसाल्यांसोबत भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी वस्तू म्हणजे रेशमी आणि सुती वस्त्र होते. विशेषतः युरोपात (Europe) भारतातल्या हातमागावर विणण्यात आलेल्या वस्त्रांनी मोठी बाजारपेठ निर्माण केली होती.
व्यापाराची फारशी चलाखी नसली तरी भारतातला कारागिर आपल्या कलेत पारंगत होता. कोणत्याही यंत्रांशिवाय केवळ हातमागावर सुंदर वस्त्र विणण्याची कला त्याला अवगत होती. कुठलीही शिकवण नसताना सुबक कलाकृती, आकर्षक रंगसंगती आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्त्र ही भारतीय हातमागाची वैशिष्ठ्ये होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला हस्तांतरित होत गेली आणि भारतातला कापड व्यवसाय बहरत गेला.
भारतातील इतर उद्योगांच्या तुलनेत कापड उद्योग चांगल्या स्थितीत होता. त्याकाळी काही लाख लोक या उद्योगाशी निगडित होते. भारतातून सुती आणि लोकरीचे कपडे, शाली, मलमल आणि कशीदाकामाची निर्यात होत होती. 1600 नंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीने (East India Compony) पाय पसरायला सुरूवात केली. भारतातल्या महत्वाच्या उद्योगांमध्ये कापड उद्योगाची जगभरात चलती आहे हे इंग्रजांच्या लक्षात आलं. त्यानंतर ब्रिटनमध्ये (Briton) उत्पादित झालेल्या कापडाला लोकप्रिय करण्यासाठी भारतात अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कापड उद्योगाला इंग्रजांकडून उद्ध्वस्थ करण्यात आलं. (The history of handloom industry in the country on the occasion of ‘National Handloom Day’)
1800 च्या शतकात बंगाल केवळ भारतातच नाही तर जगात कापडउद्योगाचं महत्वाचं केंद्र बनलं होतं. इथले लोक जगभरात समुद्रामार्गे कापड पोहोचवून चांगलं उत्पन्न मिळवत होते. रेशीम उत्पादन आणि रेशमावर सोन्या-चांदीने केल्या जाणाऱ्या नक्षीकामाबद्दल अहमदाबाद जगभर प्रसिद्ध होतं. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये या कपड्यांना इतकी जास्त मागणी होती की ही मागणी थोपवण्यासाठी सरकारला त्यावर कर लावावा लागला होता.
1813 साली गव्हर्नरला ब्रिटन संसदेत एक प्रश्न विचारण्यात आला, की औद्योगिक क्रांती झाल्यानंतरही ब्रिटनमध्ये तयार झालेलं कापड भारतात विकले का जात नाही? त्यावर त्या गव्हर्नरने उत्तर दिलं होतं की, भारतातल्या कापडाची गुणवत्ता ब्रिटनच्या कापडापेक्षा जास्त आहे.
या सगळ्या इतिहासानंतर स्वातंत्र्य चळवळीत (Indian Independence Movement) पडलेल्या स्वदेशीच्या ठिणगीनं देशातल्या हातमाग उद्योगाला पुन्हा नव्याने चालना मिळाली. विदेशी वस्तुंची होळी करून 7 ऑगस्ट 1905 रोजी ‘स्वदेशी’चा नारा देण्यात आला. यामध्ये विदेशी वस्तुंचा वापर सोडून देशात तयार होत असलेल्या वस्तुंचा पुरस्कार करण्यात आला. यानंतरच स्वातंत्र चळवळींतल्या अनेक दिग्गज पुढाऱ्यांनी खादी (Khadi) वापरण्यास सुरूवात केली जी परंपरा आजही कायम आहे. याच स्वदेशी आंदोलनाचं स्मरण म्हणून आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येतो.
एवढा प्रचंड इतिहास असलेला आणि अनेक स्थित्यंतरं पाहिलेला भारतातला कापड उद्योग आजही आपली वेगळी ओळख टिकवून आहे. जगभरातल्या बदलत्या ट्रेन्डप्रमाणं भारतातल्या कापड उद्योगानंही स्वतःला काळानुरूप धाग्यात गुंफून घेतलंय. कापड विणता विणता भारत नावाच्या संकल्पनेची अर्थव्यवस्था विणणाऱ्या आणि कित्येक शतकं जगाच्या पाठीवर भारताची कलात्मक ओळख टिकवून ठेवणाऱ्या असंख्य कारागिरांचं आज राष्ट्रीय हातमाग दिवशी स्मरण.