आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र यासारखे अनेक महत्त्वाचे कागदपत्र असतात. अनेक सरकारी दस्तऐवजांची तुम्हाला माहिती असेल. ही कागदपत्रे सरकारद्वारे जारी केली जातात. ती एका व्यक्तीची ओळख असते. ही कागदपत्रे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जातात. ऑनलाइन फॉर्म भरणे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतंत्र ओळखपत्र आहे.
पण, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादीचे काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या दस्तऐवजांचे काय करावे हे तुम्हाला माहिती हवे. जेणेकरुन कोणीही त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करू नये. प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे असते. आधार कार्डावर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिलेला असतो, त्याला आधार कार्ड नंबर म्हणतात. हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते. लोकांना त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड निष्क्रिय किंवा रद्द करण्याची तरतूद नाही. मृत्यू नोंदणीसाठीही आधार कार्ड अनिवार्य नाही. मृत व्यक्तीच्या आधारचा गैरवापर होणार नाही याची काळजी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घ्यावी. आधारशी जोडलेला बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, बायोमेट्रिक्स UIDAI वेबसाइटद्वारे लॉक केले जाऊ शकतात.
आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, बँक आणि डीमॅट खाती चालवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी, ज्याच्या अधिकारक्षेत्रात पॅन नोंदणीकृत आहे त्या मूल्यांकन अधिकाऱ्याला (AO) अर्ज लिहा. यामध्ये मृत व्यक्तीचे नाव, पॅन, जन्मतारीख आणि मृत्यू प्रमाणपत्राची फोटो कॉपी टाका. पॅनकार्ड सरेंडर करणे बंधनकारक नाही, परंतु सर्व आर्थिक बाबींचा निपटारा झाल्यानंतर ते करता येते.
निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. मतदार ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया आहे. 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार, मृत व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द केले जाऊ शकते.