मुंबई: अनेकदा असे दिसून आले आहे की काही लोकांना जास्त झोप येते, तर काही लोक असे असतात ज्यांना झोप न येण्याची चिंता असते. पण जेव्हा एखादी व्यक्ती पुस्तक वाचायला घेते तेव्हा तिला काही वेळातच झोप येऊ लागते. मुलं अनेकदा म्हणतात की, अभ्यासाला बसताच त्यांना भरपूर झोप येऊ लागते, पण खेळताना किंवा इतर कोणतेही काम करताना त्यांच्या बाबतीत असे होत नाही. तुमच्या बाबतीतही असं अनेकदा घडत असेल, पण असं का होतं हे तुम्हाला कधी लक्षात आलंय का? एखादे पुस्तक हातात घेतल्यावर झोप का येते? तुम्हाला जर या बाबतीत अजिबातच कल्पना नसेल तर याचं वैज्ञानिक कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की, वाचताना येणारी झोप आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप हानिकारक आहे. यामागच्या वैज्ञानिक कारणांबद्दल सांगायचे झाले तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वाचताना सर्वात जास्त दबाव आपल्या डोळ्यांवर पडतो. त्याचबरोबर आपला मेंदू संगणकासारखा सर्व डेटा साठवून ठेवतो. एवढ्या दडपणामुळे आपले डोळे आणि मेंदूला विश्रांती हवी असते याच कारणामुळे वाचताना आपल्याला झोप येते.
या समस्येला सामोरं जाण्यासाठी, आपण चांगल्या प्रकाशात अभ्यास करणे महत्वाचे आहे. वाचताना नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही जिथे बसून वाचत आहात, तिथे बाहेरून हवा आणि प्रकाश दोन्ही असावं. हवा खेळती असावी यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतील आणि वाचताना तुम्हाला झोपही येणार नाही.
बहुतेक विद्यार्थी पलंगावर बसून किंवा पडून अभ्यास करतात. अशा वेळी तुमचे शरीर रिलॅक्स पोझिशनमध्ये जाते आणि फक्त तुमचे डोळे आणि तुमचे मन काम करत असते. त्याचबरोबर जेव्हा शरीर हळूहळू पूर्णपणे रिलॅक्स होते, तेव्हा तुम्हाला झोप येऊ लागते.
अभ्यास करताना, पुस्तक वाचताना विद्यार्थ्यांनी वाचन करताना चेअर टेबलचा वापर करावा, असे सांगितले जाते. खुर्चीवर बसून वाचन केल्याने आळस येत नाही. याशिवाय विद्यार्थ्यांनी अभ्यासापूर्वी हलके अन्न खावे, जेणेकरून वाचताना आळस येणार नाही.