GK in Marathi : मुंबई किंवा इतर शहरांमध्ये आपण रेल्वेचा प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवरील पाटी तर पाहिली तर त्यावर तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल की, त्यावर समुद्र सपाटीपासूनचे अंतर लिहिलेले असते. पिवळ्या बोर्डवर रेल्वे स्थानकाच्या नावा खाली ते लिहिले जाते. तुम्ही कधी या पाट्या नीट बघितल्या असतील तर तुमच्या ते लक्षात येईल. रेल्वे स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का दिलेली असते हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याचा नेमका काय फायदा असू शकतो? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही छोटीशी माहिती ट्रेनच्या लोको पायलटसाठी किती महत्त्वाची असते.
रेल्वे स्थानकाच्या फलकावर लिहिलेली ‘समुद्र सपाटीपासूनची उंची’ याचा प्रवाशांशी काहीही संबंध नसतो. पण ट्रेन चालवणाऱ्या लोको पायलटसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असते. हे फक्त भारतातच आहे असे नाही. जगभरात जमिनी या उंच आणि खालीवर असतात. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी त्या जागेची समुद्रसपाटीपासूनची उंची वेगवेगळी असते. समुद्रापासून दिल्लीची उंची पाहिली तर ती २०७ मीटरच्या आसपास आहे, तर मुंबईची उंची ७ मीटरच्या आसपास आहे. दिल्ली आणि मुंबईचा या अंतरावरुन तुमच्या हे लक्षात येईल.
कोणत्याही ठिकाणाची उंची मोजायची असेल तर समुद्र पातळी हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. ट्रेनचा पायलट आणि गार्डसाठी देखील ती महत्त्वाची असते. ट्रेन चालवणारा लोको पायलट जेव्हा एखाद्या स्थानकावरून पुढे जात असतो तेव्हा त्या ठिकाणाची अचूक उंची जाणून घेणे त्याच्यासाठी खूप महत्वाचे असते. कारण त्याच्या मदतीने लोको पायलट ट्रेनच्या इंजिनला उंचीनुसार पॉवर आणि टॉर्क जनरेट करण्यासाठी कमांड देऊ शकतो. ट्रेन सामान्य वेगाने उंच किंवा कमी पृष्ठभागावर सहज धावू शकते.
रेल्वेच्या मार्गावर सर्व ठिकाणी समुद्रसपाटीपासून किती उंची आहे याची माहिती देणे शक्य नाही. त्यामुळे ही माहिती रेल्वे स्थानकाच्या फलकावर दिली जाते. जेव्हा एखादा लोको पायलट रेल्वे स्थानकावरून जात असतो तेव्हा त्याला त्या जागेची उंची मोजून इंजिनला योग्य आदेश देऊ शकतो.