नवी मुंबईः अॅमेझॉनचे बोगस कॉलसेंटर (Bogus call center) चालवून त्यातून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या लोकांची बनवेगिरी नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) उघडी पाडली आहे. या बोगस कॉल सेंटरचा आज (22 नोव्हेंबर) पोलिसांनी पर्दाफाश केला असून या गुन्ह्याखाली 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लॅपटॉपसह इतर सायबर गुन्हेगारीसाठीचे (Cyber crime) साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 20 मधील शिवशंकर हाईट इमारतीत अॅमेझॉन नावाने हे लोक बोगस कॉल सेंटर चालवत होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन केले जात होते. तुमचे अकाउंट हॅक झाल्याचे सांगून ते परत चालू करायचे असेल तर आपल्याला काही रक्कम भरावी लागेल, ती आपल्याला चेकद्वारे परत दिली जाईल, असे आश्वासन दिले जात होते. खातेधारकांनी दिलेली रक्कम हे लोक आपल्या अकाउंटवर वळवून घेत असत. अशा प्रकारे या लोकांना अनेक अमेरिकन नागरिकांना फसवल्याचे चौकशीत मान्य केले आहे.
विशेष म्हणजे असा प्रकारे चोरी करण्यासाठी या लोकांनी अॅमेझॉनचा कॉल डेटा हॅक केल्याचे सांगितले आहे. या कारवाईत सात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाइल, 4 हेडफोन आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर बातम्या-