नांदेड : ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्याचे अनेकदा ऐकलं असाल. मात्र, आता केवळ फसवणूकच नव्हे, तर जीवावर बेतणारी घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या स्फोटाची हादरवणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यानं मुलाच्या हाताची बोटं तुटून पडली आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जिरगा तांड्यावर मोबाईलवर गेम खेळताना स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलाला त्याचा हात गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीपती जाधव यांनी टीव्हीवरील मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईल ऑनलाईन खरेदी केला. मात्र त्याच मोबाईलने त्यांचा मुलगा प्रशांतचा घात केला आहे.
प्रशांत नेहमीप्रमाणे मोबाईलवर गेम खेळत बसला होता. अचानकपणे मोबाईलचा स्फोट झाल्याने त्याच्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळ्यासह पाचही बोटे अक्षरशा उडून पडलीत. त्याचा तळहात छिन्नविछिन्न झाला. मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटाला लागून तेथेही त्याला दुखापत झाली.
दैव बलत्तर होत म्हणून प्रशांत वाचला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर उदगीरमध्ये खासगी रुग्णालयात त्याला पुढील उपचार करण्यासाठी पाठवलं आहे.
खेळण्या-बागडण्याच्या वयात या मोबाईलने प्रशांतचा घात केला आहे. फसव्या जाहिरातीला बळी पडून स्वस्तात ऑनलाईन फोन खरेदी करु नका.
बातमीचा व्हिडीओ :