औरंगाबादः भरधाव वेगानं येणारी कार वळणावर अचानक ब्रेक दाबल्यानं तीन वेळा पलटली (Car Accident). रस्त्याच्या खाली कोसळली. पण सुदैवाने एअरबॅगमुळे कारमधील चौघांचेही प्राण वाचले. कारच्या समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचे कारचालकाने सांगितले. औरंगाबाद जवळील निपाणीजवळ (Nipali Accident) ही घटना घडली.
शहरातील उल्कानगरी येथील केटरिंग व्यावसायिक आनंद मुथा, त्यांचे वडील, कुक जगदीशकुमार आणि मुलाराम प्रजापती हे 21 नोव्हेंबर रोजी सकाळी लग्नकार्यासाठी कारने बीडला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर रात्री ते औरंगाबादकडे निघाले. रात्री एक वाजेच्या सुमारास ते निपाणी आडगाव येथे आले. शहराकडे येत असताना एका वळणावर समोरील वाहनचालकाने अचानक ब्रेक लावला. अपघात टाळण्यासाठी आनंद यांनी डाव्या बाजूला गाडी वळवली. त्यामुळे कारवरील ताबा सुटला. गाडी दोन ते तीन वेळा उलटून रस्त्याच्या खाली असलेल्या ओढ्यात कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण होता. परंतु कारच्या समोरच्या बाजूला असलेल्या दोन्ही एअरबॅग उघडल्या. त्यामुळे गाडी चालवणारे आनंद, त्यांच्या शेजारी बसलेले वडील अजय यांना काही वेळ काय घडले हे कळलेच नाही.
सध्या बहुतांश कारमध्ये एअरबॅग असतात. पण त्या कधी अॅक्टिव्ह होतात, हे अनेक वाहनधारकांना माहिती नसते. सदर अपघातात आनंद आणि अजय मुथा यांनी सीटबेल्ट लावलेले होते. त्यामुळे हा अपघात झाला तेव्हा दोन्ही एअरबॅग उघडल्याने दुखापत झाली नाही. त्यांच्यासोबत मागे बसलेल्या दोघांना किरकोळ दुखापत झाली. काही वेळानंतर ते गाडीतून कसेबसे बाहेर पडले. वाळूजमधील मित्राला फोन करून सदर अपघाताची कल्पना दिली. मित्रांनी त्यांना लगेच घाटीत आणले. डॉक्टरांनी चौघांची तपासणी करून त्यांना घगरी पाठवले.
इतर बातम्या-