यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणारा आरोप अनिल मेश्रामला पांढरकवडा पोलिसांनी 20 दिवसांनी अटक आहे. पोलिसांनी अनिलला काल (16 डिसेंबर) अटक केली. या कारवाईवेळीही आरोपी अनिलने पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अटक वॉरंट बजावणाऱ्या पथकावर आरोपी अनिलने 25 नोव्हेंबरच्या रात्री हल्ला केला होता. या हल्ल्यात राजू कुलमेथे या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर इतर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. हल्ला केल्यानंतर आरोपी 20 दिवस फरार होता. पोलिसांनी जंगलात जंग जंग पछाडले. मात्र तो सापडत नव्हता. अखेर आज पांढरकवडा पोलिसांनी त्याला हिवरी गावजवळ एका मंदिरातून अटक केली. त्यावेळीही त्याने पोलिसांवर काठीने हल्ला करुन दोन पोलिसांना जखमी केले.
अटकेची कारवाई करताना आरोपी अनिल मेश्राम याने पोलिसांवर काठीने हल्ला करुन दोन पोलिसांना जखमी केले, त्यावेळी पोलिसांनी सुद्धा त्यांच्या संरक्षणार्थ आरोपीला मार दिला, त्यामुळे आरोपीलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
आरोपी अनिल मेश्राम हा गेल्या 20 दिवसांपासून फरार होता. तो मारेगाव च्या जंगलात राहत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. जंगलात लपून बसलेला आरोपी अनिल हा किडे, मांस, जंगली प्राणी खाऊन राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीला शोधण्यासाठी 100 पोलीसांचा फौज फाटा तैनात होता. अखेर घनदाट जंगलात लपून बसलेला आरोपी अनिल पोलिसांच्या हाती लागला आहे.